सदानंद नाईक। लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : श्रमसाफल्य योजनेत मालकी हक्काची घरे, सफाई कामगारांच्या सरसकट बदल्या, पदोन्नती, नोकरभरती आदीच्या निषेधार्थ भारतीय सफाई मजदूर काँॅग्रेस संघटनेने सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा आयुक्तांना दिला आहे. आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून कामबंद आंदोलनाने शहरात पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. उल्हासनगर महापालिका प्रशासनाने सफाई कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगार नेते चरणसिंग टांक, राधाकृष्ण साठे, श्याम गायकवाड, दिलीप थोरात यांनी केला आहे. कॅम्प नं-५ वाल्मिकीनगर येथे श्रमसाफल्य योजने अंतर्गत सफाई कामगारांसाठी गृहसंकुल उभे करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी केंद्र सरकारने ८ कोटीचा निधी दिला होता. मात्र पालिका प्रशासन व कंत्राटदाराच्या दुर्लक्षतेमुळे गृहसंकुल योजना ९ वर्ष रखडली. अखेर केंद्र सरकारने योजना मुदतीत पूर्ण केली नाही असा ठपका ठेवत व्याजासह निधी परत मागवला. यामुळे पालिकेवर नामुष्की ओढवली असून कोणताही गाजावाज न करता स्वत:च्या निधीतून गृहसंकुल योजना पूर्ण केले. यापूर्वी पालिका व कंत्राटदाराच्या दुर्लक्षतेमुळे बीएसयूपी योजनेचा ३२ कोटीचा निधीही परत गेल्याने हजारो गरीब नागरिकांना घरे मिळालेली नाहीत. सफाई कामगारांना मिळणाऱ्या मालकी हक्काच्या घरावर गदा आली आहे. पालिकेने २५ वर्ष सेवा झालेले व पूर्वी राहत असलेल्या सफाई कामगारांना मालकी हक्काने तर इतर घरे भाडयाने देण्याचा पवित्रा घेतला आहे. पालिकेच्या या धोरणाला कामगार संघटनेने विरोध केला. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे केंद्र सरकारचा निधी परत गेला असून मागासवर्गीय कामगारांवर अन्याय झाल्याचा आरोप टाक यांनी केला आहे. इतर कामगार संघटना कामगारांच्या पाठीमागे उभ्या राहिल्याने, महापालिका विरूध्द कामगार संघटना असा सामना रंगणार आहे. ३०५ सफाई कामगारांची भरती, नोकरभरती, पदोन्नती, सरसकट बदल्या, गणवेश नाही आदी मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ टाक यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच सरसकट १२५० सफाई कामगारांची बदली आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केल्याचा त्यांनी निषेध केला आहे.
उल्हासनगरमध्ये साचणार कचरा?
By admin | Published: May 24, 2017 1:00 AM