- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहराचा ७२ व्या वर्धापनदिना निमित्त ऐतिहासिक कोनशिलेला आमदार कुमार आयलानी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदींसह सामाजिक संघटना पदाधिकारी, नागरिकांनी पुष्पहार अर्पण केले. तर काँग्रेसच्या वतीने यावेळी लाडूचे वाटप करून एकमेकांना शहराच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उल्हासनगरच्या ७२ व्या वर्धापनदिन निमित्त महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आलेली शहराची ऐतिहासिक कोनशिलेला फुलांनी सजविले आले होते. कोनशिलेला महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध पक्षाच्या नेते, नगरसेवक, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, शालेय मुले आदींनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी समाजसेवक शशिकांत दायमा यांनी वर्धापनदिनी येणाऱ्या नागरिकांना एक वही व पेन आणण्याचे आवाहन केले होते. आणलेल्या वह्या व पेन गोरगरीब व गरजू शालेय मुलांना देण्यात येणार असल्याचे दायमा म्हणाले. तर ऐतिहासिक कोनशिलेचे नुतनीकरण करण्याचे संकेत यावेळी उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. तर काँग्रेस पक्षाचे किशोर धडके, मैनिद्दीन शेख, शंकर आहुजा आदी पक्ष्याच्या कार्यकर्त्यानी लाडूचे वाटप केले.
फाळणीच्या वेळी सिंधू प्रांतातील आलेल्या विस्थापित सिंधी बांधवासह इतरांना कल्याण शहराजवळील लष्करी ब्रिटिश छावणीतील बरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. छावणी शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून विस्थापितांच्या वस्तीला देशाचे पाहिले गव्हर्नर सी राजगोपालाचारी यांनी ८ ऑगस्ट रोजी उल्हासनगर नाव देण्यात आले. तेंव्हा पासून शहराचा वर्धापनदिन ८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. ७२ वर्षात शहराने राज्यात नव्हेतर देश विदेशात नावलौकिक मिळविला. मात्र अद्यापही शहरात मूलभूत सुखसुविधा पासून वंचित आहे. पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, डम्पिंग ग्राऊंड, साफसफाई, आरोग्य सुविधा, अवैध व धोकादायक बांधकामे आदी अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. शहरात पुन्हा उल्हास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज यावेळी सर्वांनी व्यक्त केली.