सदानंद नाईक
उल्हासनगर : प्लास्टिकच्या पिशवीत नालीत टाकलेल्या टायगरला समाजसेवक शिवाजी रगडे दाम्पत्यासह अनेकांच्या मदतीमुळे नवजीवन मिळाले. टायगरचा ३० डिसेंबर रोजी दुसरा वाढदिवस नवीमुंबई येथील बालगृहात साजरा होत असून कोरोनाच्या पाश्वभूमीवर बालगृहाने उल्हासनगरवासियास भेटण्यास मनाई केल्याने, त्यांचा हिरमोड झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ रेणुका सोसायटी येथील नालीतील एका प्लास्टिक पिशवीतून लहान मुलांचा रडण्याचा आवाज आल्याने महिला जमा झाल्या. समाजसेवक शिवाजी रगडे यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी नालीत उतरून प्लास्टिक पिशवी उघडली असता काही तासापूर्वी रडलेला मुलगा जिवाच्या आतांकाने रडत होता. रगडे यांनी नागरिकांच्या मदतीने, मुलाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान मध्यवर्ती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुलाच्या आई वडिलांचा शोध सुरू केला. उपचार घेत असलेल्या मुलाला म्हणजे टायगरला नालीतील पाण्याने संसर्ग झाल्याने, पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. या घटनेला २ वर्ष पूर्ण झाले आहे.
मुलाला जीवदान देण्यासाठी रगडे दाम्पत्यांनी उपचाराचा संपूर्ण खर्च उचलून खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र संसर्ग वाढल्याने मुलाची तब्येत चिंताग्रस्त झाली. अखेर मुलाला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. यावेळी रगडे दाम्पत्य, संरक्षणासाठी तैन्यात असलेले पोलीस व नर्स यांनी टायगरची सेवा केली. दरम्यान मेंदू मध्ये संसर्ग झाल्याने मेंदूवर दोन शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयाच्या आवाहनाला नागरिकांनी एका दिवसात लाखो रुपये बँकेत जमा केले. अखेर उपचाराला यश येऊन टायगर ठणठणीत झाल्यावर, त्याला शासन नियमानुसार मुंबई येथील बालगृहात हलविण्यात आले. तब्येत ठणठणीत असलेला टायगर बालआश्रमात बोबडे बोल बोलत असून त्याने सर्वांना आपलेसे केले. आज त्यांचा दुसरा वाढदिवस असल्याने त्याला भेटण्यासाठी रगडे दाम्पत्यांसह इतर नागरिकांनी भेटण्याची परवानगी मागितली. मात्र बालगृहाने कोरोनाच्या पाश्वभूमीवर भेटण्यास मनाई केल्याने, त्यांचा हिरमोड झाला आहे.
दत्तक प्रक्रिया रखडली
टायगरची पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार ज्योती कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह अनेकांनी भेट घेतली. अभिनेता सलमान खान यांनीही टायगरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र टायगरच्या मेंदूवरील शास्त्रक्रिये मुळे त्यांचे दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला अडथडा येत असल्याची शक्यता समाजसेवक शिवाजी रगडे यांनी व्यक्त केला आहे.