कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५५० कर्मचाऱ्यांना थकीत महागाईभत्ता अदा करण्याचा निर्णय केडीएमटी प्रशासनाने घेतला आहे. हा भत्ता मार्च-एप्रिलच्या वेतनात लागू केला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल २१०० रुपयांची लक्षणीय वाढ होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. यामुळे उपक्रमावर दरमहा ११ लाखांचा बोजा पडणार आहे.उपक्रमात दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात वेतन मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. परंतु, थकीत भत्ता लागू करण्याच्या निर्णयामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.उपक्रमाचे उत्पन्न आणि खर्चातील वाढती तफावत पाहता कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केडीएमसीकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते. यात महापालिकेकडून अनुदान उशिराने उपलब्ध होत असल्याने केडीएमटी कर्मचाऱ्यांना वेतन नेहमीच उशिरा मिळते.दरम्यान, परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना देय असलेला २०१४-१५ सालातील थकीत महागाईभत्ता अदा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १ जुलै २०१४ मध्ये ७ टक्के, जानेवारी २०१५ मध्ये ६ टक्केआणि जुलै २०१५ मध्ये आणखी ६ टक्क्यांची वाढ होऊन १९ टक्क्यांपर्यंत हा भत्ता पोहोचला होता. या थकीत भत्त्यासंदर्भात सभापती भाऊसाहेब चौधरी, परिवहन सदस्य आणि प्रशासन यांची विशेष बैठक पार पडली. (प्रतिनिधी)
अखेर थकीत महागाईभत्ता होणार अदा!
By admin | Published: April 22, 2016 1:51 AM