ठाणे : ठाणे महापालिकेच्या सुरक्षारक्षकपदांच्या उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त तब्बल तीन वर्षांनंतर पालिकेला सापडला असून त्यांनी ३८० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेवर अनेक आक्षेप असतानादेखील पालिकेने ही यादी जाहीर केली आहे. तसेच बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचा ठराव पारित झालेला असतानादेखील आता पुन्हा त्यांना वर्षभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या सुरक्षारक्षक भरती प्रक्रि येमध्ये अनंत घोळ घातल्यानंतर अखेर तीन वर्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना या उमेदवारांना दिल्या असून तोपर्यंत मात्र भांडुप बोर्डाच्या सुरक्षारक्षकांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ठाणे महापालिकेच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डाच्या ३७५ सुरक्षारक्षकांवर अवलंबून आहे. त्यामुळे स्वत:ची सुरक्षाव्यवस्था उभारण्यासाठी पालिकेने नोव्हेंबर २०१३ मध्ये महापालिकेने सुरक्षारक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात केली. ३८५ पदांसाठी सुमारे ७० हजार इच्छुक उमेदवार मैदानी चाचणी देण्यासाठी ठाण्यात धडकले होते. एकेका दिवशी तीन हजार उमेदवारांची चाचणी घेणे अशक्य झाल्याने पालिकेने ही भरती आॅनलाइन केली. परंतु, तेथेही घोळ झाला. अखेर, मेरिटवर उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीसाठी पाचारण केले. ही चाचणी उमेदवारांनी दिली असली तरी निवडीसाठी शैक्षणिक मेरिटलाच प्राधान्य दिल्यामुळे लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यामुळे ही भरती प्रक्रिया अडीच ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ रखडली.भांडुप बोर्डाच्या सुरक्षारक्षकांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने गेल्या वर्षी महासभेत सादर केल्यावर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरून चार महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. अखेर, या सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून महापालिकेने सुरक्षारक्षकांच्या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रशासनाच्या वेबसाइटवर जाहीर केली आहे. सुरक्षारक्षकपदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी महापालिकेने जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात पदावर रु जू होण्यासाठी किती काळ लागेल, याविषयी शंका आहे. त्यामुळे भांडुप बोर्डाकडून घेतलेल्या खासगी सुरक्षारक्षकांना मुदतवाढीचा दिली आहे. वेबसाईटवर जाहीर केलेल्या यादीत २१ प्रकल्पग्रस्त, सात भूकंपग्रस्त उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय, महिलांसाठी ११६ आरक्षित पदे असून २१ खेळाडूंचांही सुरक्षारक्षकपदांवर निवड केली आहे.
अखेर सुरक्षारक्षकांंची यादी जाहीर
By admin | Published: April 17, 2016 1:04 AM