डोंबिवली : वातानुकूलित यंत्रणेच्या कामासाठी नऊ महिने बंद असलेले येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर उद्यापासून खुले होणार आहे. नाट्यगृह लवकर सुरू करण्याची मागणी कलावंत, नाट्यनिर्माते आणि रसिक करत होते. अखेर, प्रतीक्षा संपली असून उद्या कोणताही मोठा कार्यक्रम न करता नाट्यगृह खुले करण्यात येणार आहे.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सावित्रीबाई फुले कलामंदिर वातानुकूलित यंत्रणेच्या कामासाठी बंद ठेवले होते. नाट्यगृहामधील वातानुकूलित यंत्रणेला एमआयडीसी भागातील रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका बसल्याने कल्याणमधील अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर चिलर वातानुकूलित यंत्रणा येथे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी मागणी कलावंत आणि दिग्दर्शक करत होते. बरेच महिने नाट्यगृह बंद असल्याने सांस्कृतिक उपासमारीबाबत रसिकांसह कलावंतांकडूनही नाराजी व्यक्त होत होती. वातानुकूलित यंत्रणा बदलण्याचे काम अखेर पूर्ण झाल्याने २८ जुलैला कलामंदिराच्या १२ व्या वर्धापनदिनी हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्यात येणार होते. पण, नाट्यनिर्माते आणि रसिकांच्या आग्रहाखातर हे नाट्यगृह वर्धापन दिनापूर्वीच म्हणजे १५ जुलैला चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै-आॅगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत नाटकांच्या तारखांचे वाटप करण्यात आले आहे. तारखांचे बुकिंग करण्यासाठी आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंतचे अर्जही आले असल्याची माहिती नाट्यगृह व्यवस्थापनाने दिली.दरम्यान, सोमवारी नाट्यगृह सुरू होत असताना कलामंदिराच्या तळमजल्यावर असलेल्या प्रबोधनकार कै. केशव सीताराम ठाकरे कलादालनात केडीएमसीतर्फे लावलेला भलामोठा पंखा सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहे. हा पंखा मुख्य रंगमंचाच्या सभागृहात लावला जाणार होता. पण, तिथे नव्याने चिलर वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आल्याने तो कलादालनात लावण्याचा निर्णय घेण्यात आला. लो व्हॉल्युम लार्ज स्पीड असलेल्या या पंख्याला १६ फुटांचे पाच पाते आहेत..आज नाट्यप्रयोग नाहीसोमवारपासून नाट्यगृह खुले केले जाणार असले, तरी कोणताही कार्यक्रम होणार नाही. तसेच, नाटकाचे बुकिंग झालेले नसल्याने नाट्यप्रयोगही होणार नाही. उर्वरित दिवशी (शनिवार आणि रविवार) नाटकांचे बुकिंग जोरदार झाले असल्याची माहिती सूत्रांनीदिली आहे.>वर्धापनदिनी स्थानिक कलावंतांचे सादरीकरण : कलामंदिराचा १२ वा वर्धापन दिन २८ जुलैला साजरा केला जाणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील स्थानिक कलावंत वर्धापन दिनानिमित्त कला सादर करणार आहेत. गेल्या वर्षी सहभागी झालेल्या कलावंतांचा आकडा साडेतीनशेच्या आसपास होता. यंदा हा आकडा आणखीन वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत कार्यक्रम सादर होणार आहे. गेल्या वर्षी तरुणांतील नैराश्य हा विषय होता. यंदा ‘कालची आणि आजची करमणूक’ असा विषय घेण्यात आला आहे.
अखेर नाट्यरसिकांची प्रतीक्षा संपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:59 AM