उल्हासनगर : जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यासह अन्य जणांवर कारवाई करा, या मागणीसाठी स्मशानभूमीसमोर उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांसह व्यापारी, नागरिक आदींनी बुधवारी महापालिकेवर भ्रष्टाचाराची अंत्ययात्रा काढून पालिका आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध केला आहे.भदाणे यांच्या केबिनमध्ये ३८७ फाइलसह मोठे घबाड सापडले. सापडलेल्या दस्तऐवजावर भदाणे यांचा खुलासा मागितल्यानंतर भदाणेंसह अन्य दोषींवर आयुक्त कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी थेट स्मशानभूमीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत पत्रकार, समाजसेवक, व्यापारी व नगरसेवक प्रमोद टाले यांनी साखळी उपोषण केले. आमदार ज्योती कलानी, महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी यांच्यासह अन्य पक्ष नेते, व्यापारी, नागरिक, सामाजिक संस्था आदींनी उपोषणाला पाठिंबा देत कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. दुपारी १ वाजता कॅम्प नंबर-४ येथील स्मशानभूमी येथून अंत्ययात्रेला सुरुवात होऊन महापालिकेवर दुपारी अडीच वाजता धडकली. रिपाइंचे भगवान भालेराव, प्रकाश तलरेजा, जगदीश तेजवानी आदींनी आयुक्तांचा निषेध करत कारवाईची मागणी केली.नगरसेवक गप्पभदाणे यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले असताना राजकीय नेते गांभीर्याने का घेत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांनी हा विषय उचलला तेही वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर पालिकेवर भ्रष्टाचाराची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:08 AM