कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच, प्रकल्पातील कचऱ्यावर घाेंगावणाऱ्या माशा घरात शिरत असल्याने आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी साेमवारी प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेऊन केडीएमसीच्या कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यास जाब विचारला. नागरिकांचा त्रास कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केले आहे. आता महापालिका हद्दीतून गोळा होणारा कचरा हा उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जात आहे. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याने त्या परिसरातील नागरिकांची कचऱ्याच्या त्रासातून सुटका झाली. उंबर्डे येथील हा प्रकल्प बंदिस्त असणे गरजेचे हाेते, मात्र तो उघड्यावर असल्याने नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी १७ गाड्याच येणे अपेक्षित आहे. मात्र, तेथे त्यापेक्षा जास्त गाड्या येतात. येथे येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. याकडे स्थानिक नागरिक चिंतामणी लोखंडे यांनी लक्ष वेधले. अखेर संतप्त नागरिकांनी लोखंडे यांच्या पुढाकाराने साेमवारी प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेतली. तेथे पोलीसही पोहाेचले होते. कचरा प्रकल्पाच्या कंत्राटदाराचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यास संतप्त नागरिकांनी जाब विचारला. तसेच हा प्रकल्प बंद केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
दुसऱ्या डम्पिंग ग्राउंडची तयारी?
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनीही आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महापालिका हद्दीतील सगळाच कचरा उंबर्डे येथे टाकला जाऊ नये. केवळ ब आणि क प्रभागातील कचऱ्यावर प्रक्रिया करू शकता. मात्र सर्वच कचरा येथे टाकून आधारवाडीनंतर दुसरे डम्पिंग ग्राउंड उंबर्डे येथे तयार करायचे आहे का, असा संतप्त सवालही भोईर यांनी उपस्थित केला होता.
-----------------