ठाणे : ठाणेजिल्ह्यातील ठिकठिकाणी सुरू असलेले अनधिकृत पब, ऊका पार्लर त्वरीत बंद करून १० वाजेनंतर सर्व वाईनशॉप बंद करावी. त्यामुळे ठाणेकर युवा पिढीचे संभाव्य नुकसान टाळता येईल, अशी मागणी भाजपा आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष संजय वाघुले, भाजपाचे युवा माेर्चाचे सुरज दळवी यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आठ दिवसात धडक कारवाई न केल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
पुण्यात घडलेल्या कार अपघातामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील या घटनेची पुनरावृत्ती ठाणे जिल्ह्यात हाेऊ नये, त्यासाठी त्वरीत उपाययाेजना हाती घेण्यात याव्या. याशिवाय पब, ऊका पार्लर त्वरीत बंद करून १० वाजेनंतर सर्व वाईनशॉप बंद करण्याची धडक कारवाई जिल्ह्याभरात करण्यात यावी अन्यथा त्या विराेधत आठ दिवसात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा भाजपाने जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
मनमानीपणे सुरू असलेले पब, ऊका पार्लर, बीअर बार आदींमुळे युवा पिढीचे नुकसान होत आहे. पुण्यात घडलेल्या घटनेत पहाटेच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या विकासकाच्या मुलाने दोन निष्पःप मुलांचे बळी घेतले आहे. असा प्रकार आपल्या ठाण्यात घडू नये म्हणून आपण पब, ऊका पार्लर, रात्री १० नंतर चालू असणारे वाईनशॉपवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी भाजपाने लावून धरली आहे.