नितिन पंडीत
भिवंडी ( दि. २० ) शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगर येथे एका घराची भिंत कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अरविंद सिंग ( वय ४५ ) असे मयत कामगाराचे नाव असून रामनगर येथे एका इमारतीच्या पहिल्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम सुरू होते. रविवारी दुपारी भिवंडीतील ग्रामीण भागासह शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला . या वार पाण्यात अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. हि भिंत इमारतीच्या बाजूला असलेल्या चाळीवर कोसळली. या चाळीच्या खोलीत अरविंद सिंग हा कामगार दुपारी विश्रांती घेण्यासाठी झोपला होता. मात्र भिंतीचा मलबा अरविंद याच्या अंगावर कोसळल्याने त्याखाली दबून अरविंद सिंग याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मनपाच्या आपत्ती विभागासह अग्निशमन दल व पोलीस दाखल झाले असून सध्या महापालिकेच्यावतीने या अनधिकृत इमारती वर तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भिवंडी शहरात अनधिकृत बांधकामांवर मनपा आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला असतांनाही अशा प्रकारे अनधिकृत बाबधकाम राज रोस पणे शहरात सुरूच असून मनपा आयुक्त संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांसह अनधिकृत बांधकाम करणाऱ्या घर मालकावर नेमकी कारवाई करणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.