मीरा रोड : भाजपात प्रवेशासाठी नकार देणाºया शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबीयांचे तीन मजली अनधिकृत बांधकाम तोडून भाजपाने सोमवारी शिवसेनेसह अन्य विरोधकांना एकप्रकारे इशाराच दिला.या ठिकाणी ग्रामपंचायत काळापासूनचे बांधकाम होते. समोरच्या रस्त्यासाठीही आमची सुमारे दोन हजार फूट जागा गेली आहे. पण त्याचा मोबदला न देता केवळ राजकीय द्वेषापोटी कारवाई झाल्याचा आरोप माजी नगरसेविका जयाताई भोईर यांनी केला आहे. मीरा भार्इंदर महापालिकेने मीरा गाव-मुन्शी कंपाऊंड मार्गावरील कृष्णस्थळ कॉम्प्लेक्सजवळचे तीन मजली बांधकाम सोमवारी भुईसपाट केले. त्यात १२ गाळे व १२ घरे होती. आॅगस्टमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुकेश मेहता हे दिवंगत यशवंत भोईर यांचा मुलगा कमलेश यांच्याकडून पराभूत झाले होते. कमलेश हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते.निवडणुकीनंतर मेहता यांनी हे अनधिकृत बांधकाम नगरसेवक कमलेश भोईर यांचे असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासह बांधकाम तोडण्याची मागणी केली होती. पालिकेनेही या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात कमलेश भोईर यांना नोटीस पाठवून या बांधकामाच्या परवानगीची आवश्यक कागदपत्रे सादर करा; अन्यथा ते अनधिकृत म्हणून तोडले जाईल, असे बजावले होते. त्यावर कमलेश यांनी आपल्या नावे काढलेली नोटीस चुकीची असल्याचे सांगत ही जमीन व येथील जुने घर हे वडील यशवंत भोईर यांचे नावे असल्याचे आणि तेही ग्रामपंचायत काळापासूनचे असल्याचे पालिकेला कळवले होते. पालिकेने त्यावर कर आकारल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यशवंत भोईर यांनी या जुन्या बांधकामाच्या ठिकाणी नवे बांधकाम सुरु केले होते. कमलेश यांनी लेखी दिलेल्या पत्रा सोबत सातबारा, मालमत्ता कराचे देयक व बांधकाम नकाशा जोडला होता. तसेच वडिलांनंतर आई जयाताई व त्यांची मुले वारस असल्याचे म्हटले.त्या नंतर पालिकेने पुढे काही कारवाई केली नाही किंवा जयाताई यांना नोटीस दिली नाही. दुसरीकडे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचे निकवर्तीय मानले जाणारे मुकेश मेहता यांनी मात्र बांधकाम तोडण्यासह नगरसेवकपद रद्द करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालवला होता.अखेर सोमवारी पालिकेने पोकलेनच्या सहाय्याने ही तीन मजली इमारत तोडली. वास्तविक पालिका निवडणुकी आधीपासूनच भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाकडून कमलेश भोईर यांच्यासह त्यांचे नगरसेवक भाऊ राजू व नगरसेविका भावजय भावना यांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु या तिन्ही नगरसेवकांनी सेनेचे आ. प्रताप सरनाईक यांच्यावर विश्वास ठेवत सेनेत प्रवेश केला. त्यामुळे निवडणूक संपताच भाजपा पदाधिकाºयांकडून भोईर कुटुंबीयांचे बांधकाम आणि अन्य प्रकरणांत तक्रारी सुरु झाल्या. मध्यंतरी तर राजू यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु राजू यांनी पत्रक काढून असे नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राजू यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याचे पत्र शिवसेनेने दिले. परंतु भाजपाने भोईर यांना अद्याप विरोधी पक्षनेतेपद दिलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला राजकीय रंग चढला आहे.रस्ता रुंदीकरणात जमीन किंवा बांधकाम गेले तर त्यांना पालिकेने वाढीव बांधकामाची परवानगी दिली. पण आमची सुमारे दोन हजार फूट जागा रस्त्यासाठी गेली. अन्य ठिकाणीही जमीन गेली. पण पालिकेने नोटीस न देता व आमची बाजू ऐकून न घेता केलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचे जयाताई भोईर म्हणाल्या. पालिका बाजू मांडण्यास देणार नसेल, तर रस्ते आणि अन्य कारणासाठी आम्ही जमिनी का द्याव्या, असा प्रश्न त्यांनी केला.
भाजपात प्रवेश न केल्याने अनधिकृत बांधकाम तोडले, विरोधकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 6:54 AM