डोंबिवली: येथील म्हात्रेनगरमध्ये एका भुखंडावर अनधिकृत बांधकाम सुरू होणार असल्याचा तक्रार अर्ज स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांसह प्रशासनाला दिला आहे. परंतू महिना झाला तरीही त्यावर कोणतीही चौकशी, सुनावणी झाली नसल्याने अनधिकृत बांधकामांवर आवाज तरी कसा उठवायचा असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.
त्यांच्या प्रभागामध्ये दुस-यांदा अशी घटना घडली असून सातत्याने पाठपुरावा करुन प्रशासन सहकार्य करत नसल्याचे ते म्हणाले. ज्या भुखंडावर काम करण्याचा प्रयत्न होत आहे तेथील दोन झाडे जेसीबीने उखडल्याची तक्रारही पेडणेकर यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाला दिली आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांनी तक्रार दिली होती, पण अद्याप त्या कोणतीही कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. स्मरण पत्र देण्यात आली, अनेकदा मोबाइलद्वारे सांगण्यात आले, परंतू अत्यंत कूर्मगतीने काम सुरू असून अधिका-यांची इच्छाशक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावरून महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभाग किती सतर्क आहे हे देखिल स्पष्ट झाल्याची टिका त्यांनी केली.
अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ते होवूच नये यासाठी नगरसेवकनात्याने आम्ही प्रयत्न करत असून तशी तक्रार दिली आहे, पण तरीही त्याची साधी चौकशीही झालेली नाही. कारवाई नंतरचा भाग आहे, पण निदान दोन्ही बाजू तपासणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनाही यासंदर्भात सूचित केले असून आता पुन्हा पत्र दिल्याचे ते म्हणाले.यासंदर्भात पेडणेकर यांनी अनधिकृत बांधकाम विभाग नियंत्रक अधिकारी सुनिल जोशी यांनाही रविवारी सूचित केले. जोशी यांनीही वस्तूस्थिती बघण्यात येइल असे सांगत तथ्य असेल तर तातडीने प्रभाग अधिका-यांना कारवाई करण्यास सांगण्यात येणार असल्याचे म्हंटले.
नगसेवक पेडणेकर यांची लेखी तक्रार नुकतीच मिळाली असून सखोल चौकशी सुरू आहे. नगररचना विभाग, अभियंता विभाग, प्रभाग अधिकारी सगळयांना त्याबाबत सूचित करण्यात आले असून झाड तोडण्यात आली का? कोणी तोडुन तेथे टाकली, की रस्ता रुंदीकरणामध्ये काही काम झाले का? अशा सर्व बाजूने माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सर्वकष माहितीनूसार जो निर्णय होईल त्यानूसार कार्यवाही केली जाईलच.
- संजय जाधव, वृक्ष प्राधिकरण समिती अधिकारी, केडीएमसी