ठाणे : शीळ-डायघर परिसरात नव्याने विकास कामे सुरू असून त्याठिकाणी विकासकांनी अनधिकृतपणे नळ जोडण्या घेतली असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. या अनधिकृत नळजोडण्यांमुळे गावांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसून दुसरीकडे बिल्डरांना तीन ते चार वर्षांपासून अधिकृत नळजोडण्यांची पाणी बिलेच पाठविली जात नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला. त्यामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर पुन्हा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून डायघर भागाचा एकात्मिक विकास करण्याचे निश्चित केले आहे. या योजनेमुळे गावांमधील बांधकाम क्षेत्रालाही झळाळी मिळण्याची चिन्हे आहेत. असे असतानाच इमारतींच्या बांधकामांसाठी घेतलेल्या बेकायदा नळजोडण्यांमुळे गावांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याचा प्रकार नुकत्याच झालेल्या महासभेत पाण्याच्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान समोर आला. देसाई, खर्डी, शीळ आणि डायघर ही गावे मुख्य रस्त्यापासून आतमध्ये आहेत. तर गावांलगतच्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. याठिकाणी शंभरहून अधिक इमारती आहेत. त्यापैकी काहींची कामे पूर्ण झाली आहेत तर काहींची कामे सुरू आहेत. गावांमध्ये १५ ते २० वर्षापूर्वी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांमधून इमारतींना अधिकृत नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र, अनेक विकासकांनी जास्त पाणी मिळविण्यासाठी बेकायदा नळजोडण्या घेतल्या असून त्यांवर मोटारी बसविल्याने गावांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केला.अधिकृत नळजोडण्यांनाही बिले नाहीत!डायघरमधील इमारतींमध्ये अधिकृत नळजोडण्यांची पाणी बिले तीन ते चार वर्षांपासून न पाठवल्याने महापालिकेचे नुकसान होत असल्याचा दावा पाटील यांनी केला. काही विकासकांनी वाढीव पाण्यासाठी घेतलेल्या बेकायदा नळजोडण्यांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, हे आरोप गंभीर स्वरु पाचे असल्यामुळे यासंदर्भात महापालिका प्रशासनाने खुलासा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली.
अनधिकृत नळजोडण्या डायघरमध्ये उघडकीस, बिल्डरांना महापालिकेचे अभय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 3:27 AM