मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागात पूजा नगरमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर दूरध्वनी केंद्राची गुजरात एटीएस कडून माहिती मिळताच गुन्हे शाखेने धाड टाकून सदर केंद्र उध्वस्त केले असून एकास अटक केली आहे. या केंद्रातून परदेशात मोठ्या प्रमाणात कॉलची देवाण घेवाण होत होती असे समोर आले आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष १ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास जयवंत टोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी सायंकाळी नया नगर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुजराथ राज्याचे ए.टी.एस.चे पालीस अधीक्षक परमार यांनी माहिती दिली कि , मीरारोडच्या नया नगर भागात पूजा नगरच्या एन. जी. प्लाझा मध्ये राहणारा सज्जाद सय्यद हा त्याच्या घरातून अनधिकृतपणे दूरध्वनी केंद्र चालवत आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सह सपोनि टोकले, पोलीस कर्मचारी एम.के.वेदपाठक, संतोष लांडगे, विजय गायकवाड, सुमित जाधव, भरोसा सेलच्या महिला पोलीस शिंदे यांच्या पथकाने सज्जाद याच्या घरावर बुधवारी दुपारी धाड टाकली . त्यावेळी सज्जाद हा त्याचा गुजरातच्या जुनागढ भागातील मांगरूळ येथील साथीदार सय्यद शाहिद लियाकत अली सह अनधिकृतपणे दूरध्वनी केंद्र चालवत असल्याचे आढळून आले . पोलिसांनी दोघां विरोधात गुन्हा दाखल करून सज्जादला अटक केली आहे.
अर्थिक फायद्याकरीता इंटरनेटद्वारे परदेशातुन येणारे अंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल हे त्यांच्याकडील उपकरणाद्वारे बीएसएनएल कंपनीच्या सिमकार्ड द्वारे भारतातील ईच्छित मोबाईल नंबरवर अनाधिकृत रित्या राऊट करुन देत होते . स्थानिक मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांचे तसेच भारत सरकारचे अर्थिक नुकसान करण्यासह देशाच्या सुरक्षितेला धोका निर्माण होत असल्याचे गुन्ह्यात नमूद आहे.
पोलिसांनी घटनास्थळा वरून ३२ स्लॉटचे २ सिम बॉक्स , राऊटर , बीएसएनएलची १६ तर एअरटेल व वोडाफोन ची प्रत्येकी ७ सिमकार्ड असा ३ लाख ४२ हजार रुपयांचे यंत्र साहित्य जप्त करण्यात आले आहे . गेल्या तीन महिन्या पासून तो हे बेकायदा केंद्र चालवत असल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे . त्याचा साथीदार सय्यद शाहिद अली याचा शोध पोलीस घेत आहेत . या अनधिकृत दूरध्वनी केंद्रातून कुठून व कोणाचे कॉल केले गेले याचा शोध घेतला जाणार आहे . या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस निरीक्षक कुराडे हे अधिक तपास करत आहे.