कल्याण : मागील आठ दिवसांत मुसळधार पावसामुळे दोन वेळा पुराचा तडाखा बसल्याने कल्याण पूर्वेतील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. वालधुनी परिसरातील अशोकनगर, शिवाजीनगर परिसरातील काही घरे सोमवारीही पाण्याखाली होती. दुसरीकडे शनिवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे जवळपास दोन हजार कुटुंबांचे अतोनात हाल झाले. चाळींतील घरांमध्ये पाच फूट पाणी साचल्याने अनेकांचे संसारच पाण्याखाली गेले. शालेय परीक्षा तोंडावर असताना काही विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके भिजली आहेत, तर काहींची वाहून गेली आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, काटेमानिवली, कोळसेवाडी, आडिवली, ढोकळी या भागाला पुराचा फटका बसला. काटेमानिवली परिसरात असलेल्या उल्हास नदीशेजारील रायगड कॉलनी, आकाशदीप, श्रीकृष्ण चाळ, मनीषा कॉलनी, गणेश बिल्डिंग या भागात शनिवारी रात्रीपासून पाणी शिरायला सुरुवात झाली. घराच्या खालील भागातून पाणी आल्याने लाद्या उखडल्या गेल्या आहेत. घरात पाणी शिरल्याने काही जण नातेवाइकांच्या घरी राहायला गेले. तर, काहींनी उंच ठिकाणी आसरा घेतला. पुरात अडकलेल्यांना प्रशासनाबरोबरच तरुणांनी सुरक्षितस्थळी हलवल्याने त्यांचा जीव वाचला. स्थानिक नगरसेवक मनोज राय यांनी त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली होती. सोमवारी सकाळी पूर ओसरल्याने ही सर्व कुटुंबं घरी परतू लागली होती. मात्र, पिण्याचे पाणी नसल्याने पाणी विकत आणून प्यावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.नेहरूनगर परिसरातील विनायक कॉलनीतील सुमारे २५० घरांमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी यायला सुरुवात झाली. यावेळी, कॉलनीतील तरुणांनी या घरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. येथील काहींनी नातेवाइकांकडे तर काहींनी लॉजमध्ये आपली रात्र घालवली. पुराच्या पाण्यामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, कपड्यांबरोबरच वह्या-पुस्तके खराब झाली आहेत. मात्र, पालिकेचे कोणीच फिरकले नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधी पसरली आहे. रोगराई पसरू नये, यासाठी औषधफवारणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.एसटीत काढली रात्र : खडेगोळवली परिसरात घरात पाणी यायला सुरुवात झाल्याने येथील तरुणांनी आबालवृद्धांना सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर विठ्ठलवाडी आगाराने बाहेर उभ्या केलेल्या एसटी बसेसमध्ये रात्र काढल्याचे अशोक लव्हांडे यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेत काही घरे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:06 AM