अजित मांडके, ठाणे
ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा चांगला पर्याय मिळावा, म्हणून महापालिकेने अंतर्गत मेट्रोच्या उभारणीची जोरदार तयारी सुरू केली आहे. जूनअखेरपर्यंत सर्व परवानग्या मिळवून लवकरात लवकर मेट्रोचे काम सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. त्यात आता पहिल्या टप्प्याला सुरुवात होत नाही, तोच कळवा, मुंब्रा या दुसऱ्या टप्प्याची तयारी पालिकेने केली आहे. ठाण्याची लोकसंख्या आजमितीस २२ लाखांच्या घरात असून पहिल्या टप्प्यात रोज पाच लाख प्रवासी यातून प्रवास करतील, असा दावा पालिकेने केला आहे.
रिंगरूटचा जो पूर्वीचा मार्ग होता, त्याच मार्गावरून ही मेट्रो वळवण्याचा प्रयत्न आहे. परंतु, पूर्वी रिंगरूट शक्य झाला नाही, तर आता मेट्रो शक्य होईल का? पालिकेने विविध माध्यमांतून निधी उभारण्याची तयारी केली आहे. परंतु, त्याचा परतावा किती वर्षांत करणार, याचा अभ्यास केला आहे का? ठाणेकरांवर याचा किती बोजा पडणार, याचा विचार झाला आहे का? यासह अनेक प्रश्न आहेत, ज्याचा विचार पालिकेने आताच करणे आवश्यक आहे. अन्यथा, मोनोप्रमाणेच अंतर्गत मेट्रो हा केवळ पांढरा हत्ती ठरल्याशिवाय राहणार नाही.ठाणे शहरांतर्गत पहिल्या टप्प्यात मेट्रो सुरू करण्याचा पालिकेचा इरादा आहे. या मार्गात २२ स्थानके असणार असून २९ किमीचा मार्ग असणार आहे. यातील तीन किमीचा मार्ग हा भूमिगत असणार आहे. सुरुवातीच्या स्थानकापासून ३० मीटर खाली म्हणजेच सिडको ते नवीन रेल्वेस्टेशनपर्यंतचा या मेट्रोचा मार्ग हा भुयारी असणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिका, राज्य शासन, केंद्र शासन यांच्यासोबतच जर्मन बँकेची आर्थिक मदत महापालिका घेणार आहे. या कामासाठी सुमारे १० हजार ८९३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ज्याज्या मार्गावरून पालिका मेट्रो नेण्याचा विचार करत आहे, त्यात्या ठिकाणच्या लोकवस्तीचा अभ्यास केला आहे का? या ठिकाणी पूर्वीपेक्षा अधिक बांधकामे उभी राहिली आहेत. पालिका मात्र केवळ एक हजाराहून अधिक बांधकामे यात बाधित होणार असल्याचे दावे करत आहे. परंतु, वागळे आणि त्यापुढील पट्ट्यात लोकमान्यनगर, यशोधननगर हा भाग दाटीवाटीच्या लोकवस्तीचा आहे. याठिकाणी एकमेकांना लागून घरे उभी आहेत. येथील रस्तेही अरुंद आहेत. त्यात स्थानके उभारताना लागणारी जागा, तेथील क्षमता आणि खांब उभे करण्यासाठी आवश्यक जागा कशी उपलब्ध होणार, याचा विचार होणे आवश्यक आहे. मुख्य मेट्रो ही ईस्टर्न एक्स्प्रेस वे मार्गे पूर्णपणे सर्व्हिस रोडवरून येत आहे. परंतु, अंतर्गत मेट्रो जेथून जाणार आहे, त्या मार्गात असे सर्व्हिस रोड आहेत का, याचा विचार झालेला दिसत नाही. आता मुख्य मेट्रोसाठी केवळ बॅरिकेट्स लागले असतानाच घोडबंदरसारख्या चारपदरी रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. भविष्यात अंतर्गत मेट्रोचे काम सुरू झाल्यावर वागळे किंवा लोकमान्यनगर, सिडको या भागात असे मोठे रस्ते आहेत का? तर, याचे उत्तर नाही, असे आहे. त्यामुळे या मेट्रोमुळे वाहतूककोंडी किती होईल, याचा अंदाज न बांधलेलाच बरा.
यापूर्वी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट) चा मार्ग शहरात १९९९ मध्ये मंजूर केला होता. यामध्ये रिंगरूट रेल्वे धावणार होती. परंतु, बाधित होणाºया बांधकामांमुळे हा प्रकल्प अशक्य असल्याने प्रकल्प बासनात गुंडाळला. आता त्याच रिंगरूटच्या मार्गावर अंतर्गत मेट्रो धावणार आहे. परंतु, आधीचा अनुभव गाठीशी असताना पालिकेने विचार करणे अपेक्षित आहे. या रूटसाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे, तर सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमिनीवर अतिक्र मण आहे. शिवाय, काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे. एक हजाराहून अधिक बांधकामे येथे बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे काय, त्यांच्या मोबदल्याचे काय, याचा विचार पालिकेने केलेला दिसत नाही. प्रकल्पाला चालना देण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याचे निश्चित केले आहे. परंतु, सल्लागाराचा अहवाल येण्यापूर्वीच पालिकेची एवढी लगीनघाई कशासाठी, असा सवाल शहरातील तज्ज्ञ मंडळी करू लागली आहेत. ठाणे परिसरातून मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे आणि त्यात मुख्य मेट्रो शहरातील अनेक भागांना कनेक्ट होत असल्याने अंतर्गत मेट्रोमधून किती प्रवासी प्रवास करतील, याबाबतही तज्ज्ञांच्या मनात शंका आहेत. एखाद्याला वर्तकनगर, लोकमान्यनगर, यशोधननगरवरून मुंबईकडे जायचे झाल्यास तो इतर पर्यायांचा उपयोग करून नितीन कंपनी, कॅडबरी गाठून पुढे मुख्य मेट्रो पकडून मुंबईकडे जाऊ शकणार नाही. त्यामुळे अंतर्गत मेट्रोचा वापर करेलच, ही शक्यता तशी धूसर आहे. अपेक्षित गर्दीचा अभ्यास करून मुंबईत मोनो सुरू करण्यात आली होती. परंतु, आज प्रवासी नसल्याने ही सेवा बंद करण्याची वेळ आली आहे. भविष्यात असाच काहीसा प्रकार अंतर्गत मेट्रोच्या बाबतीतही घडू नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात ठाणेकरांचा अत्यल्प प्रतिसाद असलेल्या अंतर्गत मेट्रोमुळे ठाणेकरांच्या माथी कराचा बोजा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका आयुक्तांनी येत्या जूनपर्यंत केंद्रापासून सर्व स्तरांवरील परवानग्या आणण्याची ग्वाही दिली आहे. परंतु, येत्या काही महिन्यांत लोकसभेची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे या परवानग्या जूनपर्यंत शक्य आहेत का? पहिल्या टप्प्यातच या अडचणींचा डोंगर उभा असताना आता कळवा, मुंब्य्रातही मेट्रो धावणार, अशी हमी दिली आहे. कळवा, मुंब्य्राची अवस्था तर त्याहीपेक्षा गंभीर आहे. अरुंद रस्ते, दाटीवाटीने उभ्या असलेल्या अनधिकृत इमारती, वाढलेली लोकसंख्या या सर्व बाबींचा विचार केल्यास या भागात अंतर्गत मेट्रो सुरू करण्याचे आश्वासन देणे म्हणजे येथील रहिवाशांना दिवास्वप्न दाखवण्यासारखे आहे.जून महिन्यापर्यंत ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो उभारण्याकरिता सर्व परवानग्या आणण्याचा निर्धार आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे. यापूर्वी रिंगरूट उभारून रेल्वे ज्या मार्गाने धावणार होती, त्याच मार्गाने मेट्रो जाणार आहे. मात्र, रिंगरूट प्रकल्पामुळे बाधित होणाºयांची संख्या मोठी असल्याने तो प्रकल्प कागदावरच राहिला. मेट्रो प्रकल्पातही या व अशा असंख्य अडचणी दिसत असून खरोखरच हा प्रकल्प उभा राहिला तर मुंबईतील मोनो रेल्वेप्रमाणे तो पांढरा हत्ती न ठरो, हीच अपेक्षा आहे.