- पंकज पाटीलबदलापूर - बदलापूरची ३०० कोटींची भुयारी गटार योजना ही भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चेला आलेली असताना याच योजनेला लागून असलेल्या भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी एकही कंत्राटदार पुढे येत नाही. तीनवेळा निविदा मागवूनही कंत्राटदारांनी भरल्या नाही. बदलापूर पालिकेत प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे आर्थिक हितासाठी कंत्राटदाराला त्रास देत असल्यानेच कोणताही कंत्राटदार पुढे येत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या कामासाठी पुन्हा चौथ्यांदा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे पहिल्या टप्प्याचे ३०० कोटींच्या भुयारी गटार योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामाच्या बिलावरून पालिकेत वाद निर्माण झालेला आहे. या बिलाचे वाद सुरू असल्याने त्याचे पडसाद हे भुयारी गटार योजनेच्या दुसºया टप्प्यात उमटले आहेत. दुसºया टप्प्याचे काम हे ३१ कोटी ४४ लाखांचे आहे. या योजनेत उल्हास नदीला जाणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेचे काम झाल्यास उल्हास नदीला जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन उल्हास नदीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.या कामाची पहिली निविदा १९ डिसेंबर २०१७ रोजी काढण्यात आली. मात्र, त्या निविदेला कोणीच साथ दिली नाही. कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ फिरवल्यावर ९ फेब्रुवारी २०१८ रोजी पुन्हा ही निविदा मागवण्यात आली. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, १५ मार्चला पुन्हा निविदा मागवण्यात आली. या निविदेलाही कोणीच प्रतिसाद दिला नाही. तीन वेळा निविदा मागवूनदेखील कंत्राटदार पुढे येत नसल्याने या परिस्थितीची कारणे शोधण्याचे काम सुरू झाले आहे.प्रत्येक निविदेच्या प्रक्रियेत निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांची गर्दी होते. अनेक कंत्राटदार हे टेंडर मॅनेज करण्यात व्यस्त असतात. मात्र, बदलापुरातील दुसºया टप्प्यातील भुयारी गटार योजनेच्या कामात कंत्राटदार पुढे न येण्यामागे पालिका प्रशासन आणि नगरसेवक हेच जबाबदार असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये आर्थिक लाभासाठी नगरसेवक आणि अधिकारी कंत्राटदारांना वेठीस धरतात, हे निदर्शनास आले आहे.नेत्यांनी केली चूक मान्यदरम्यान, बदलापूर पालिकेने दुसºया टप्प्याच्या कामासाठी ७८ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरीच्यावेळी या कामाची रक्कम थेट ३१ कोटी ४४ लाख रुपये केली. त्यात काही बदल केल्याने ही रक्कम कमी झाली होती. मात्र, नव्या प्रस्तावानुसार कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. या प्रकरणात बदलापूरमधील बडे राजकारणीदेखील नगरसेवकांची चूक मान्य करत आहेत. कंत्राटदारांना नगरसेवक, अधिकारी आर्थिक लाभासाठी त्रास देतात, हे स्पष्ट झाले आहे. आधीच्या योजनेतदेखील संबंधित कंत्राटदाराला आर्थिक लाभासाठीच त्रास देण्याचा प्रकार केला आहे.
भुयारी गटार योजना : कुणी कंत्राटदार देता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:19 AM