n सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील भुयारी गटारे ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. तुंबलेल्या भुयारी गटारांच्या दुरुस्तीचे काम खाजगी ठेकेदाराकडून होत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप सोनावणे यांनी दिली.उल्हासनगरात भुयारी गटार योजनेची क्षमता संपल्याने ती ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या गटारांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने खाजगी ठेकेदार नेमला असून दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, गटारे ओव्हरफ्लो होण्याचे थांबत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने भुयारी गटार योजना महापालिकेने सुरू केली असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मुख्य गटारांचे पाइप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर, वडोलगाव व शांतीनगर येथील मलशुद्धीकरण केंद्राचे कामही ९० टक्के झाले असून खडेगोळवली येथील मलशुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही, अशी माहिती सोनावणे यांनी दिली आहे.
शहरातील गुरुनानक शाळा, कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमी, दहाचाळ, संभाजी चौक, मराठा सेक्शन, सत्य साई शाळा, मुख्य रस्त्यासह शहरातील बहुतांश ठिकाणी भुयारी गटारे ओव्हरफ्लो होत असून गटारे साफ करण्याची गाडीही वेळेवर मिळत नसल्याने, सांडपाणी रस्त्यावर वाहते. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त झाले असून नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात शहरातील अंतर्गत गटारांचे पाइप बदलण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. कोरोना कालावधीत या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम ठप्प पडले असून सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी व्यक्त केली. पालिकेच्या भाेंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यातभुयारी गटारांची क्षमता केव्हाच संपली असून शहारांतर्गत भुयारी गटारांचे पाइप बदलण्याची गरज आहे. हे पाइप वेळेत बदलले नाही तर शहरात गटारे ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहून रोगराई पसरण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया सभागृहनेते भरत गंगोत्री यांनी दिली.