ठाणे : कोविड रुग्णालयातून ७२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचे शव नजरचुकीने अन्य कुटुंबाच्या हवाली केल्याचे मंगळवारी रात्री तपासाअंती उघड झाले. हा वृद्ध अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली होती. तसेच महापौर नरेश म्हस्के यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.रुग्णालयात दाखल असलेल्या या वृद्धाचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कोपरीमधील एका कुटुंबाच्या हवाली करण्यात आला. त्या कुटुंबाने हे आपलेच ‘आजोबा’ असल्याचे समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. प्रत्यक्षात कोपरीतील ज्यांच्या हवाली हा मृतदेह केला, त्यांच्या घरातील व्यक्ती आजही कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, जीवंत आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्ण बेपत्ता झाल्याचा गौप्यस्फोट केला. या संदर्भात ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीदेखील या रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टरांशी चर्चा केली. ४८ तासांत रुग्णाचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला चांगलेच खडसावले.रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता होत असताना प्रशासन झोपा काढत आहे का, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. प्रशासनाने एक आयएएस दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी नेमला आहे, तसेच एक तज्ज्ञ डॉक्टरही तेथे आहेत, याखेरीज अधिकारी, डॉक्टरांची मोठी टीम तेथे असतानाही रुग्ण बेपत्ता होतोच कसा, असा सवाल त्यांनी केला. तेथे समन्वयाचा अभाव असून सेंटरमधील डॉक्टर फोन उचलत नाहीत, त्यामुळे रुग्णावरील उपचार कसे सुरू आहेत ते नातलगांना समजत नाही. त्याचा जाब सत्ताधारी म्हणून आम्हाला द्यावा लागत असल्याचेही म्हस्के पुढे म्हणाले.दोषींवर कारवाई कराप्रशासनाच्या चुकांमुळे विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले असून सत्ताधारी म्हणून आमची बदनामी होत असल्याचे महापौरांनी सुनावले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ रुग्णाचा शोध घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले व सत्यशोधनाकरिता चौकशी समिती नियुक्त केली.विशेष पथकबाळकुम येथील कोविड रुग्णालयातून ७२ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाली आहे.या प्रकरणाच्या तपासासाठी एका विशेष पथकाची निर्मिती केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली. हे पथक कोविड रु ग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा व अन्यही कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविणार आहे.याबाबत कापूरबावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख म्हणाले की, या प्रकरणी ६ जुलैला गुन्हा दाखल झाला असून, रुग्णाच्या तपासासाठी विशेष पथकाची निर्मिती केली आहे.
आपले आजोबा समजून ‘त्यांच्या’वर अंत्यसंस्कार, ७२ वर्षीय कोरोनाबाधिताचा लागला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:12 AM