सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत शहरांमध्ये आतापर्यंत झालेल्या व सुरू असलेल्या विविध प्रकारच्या विकास कामांचा आढावा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी गुरूवारी घेतला. यावेळी त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकार्यांना या शहरांमध्ये दर्जेदार कामे करण्याचे आदेश देऊन त्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी अधिकार्यांना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, समाजकल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे, जिल्हा प्रशासन अधिकारी संतोष देहेरकर आदींसह नगरपंचायत, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी कामांसाठी उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना यावेळी सूचना देत निधीची कमतरता पडू देणार नाही, मात्र जिल्ह्यातील क्षेत्रात दर्जेदार कामे होणे आवश्यक आहेत. लोकाभिमुख विषयांवर नियोजनबद्ध काम करणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी सुधारित कर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी त्यासंबंधीची आवश्यक कार्यवाही तात्काळ सुरू करावी.पाणीपुरवठा करताना त्याचे परीक्षण करुन, योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करूनच नागरिकांना पाणी पुरविले पाहिजे. घनकचरा व्यवस्थापनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच मलनि:स्सारण प्रक्रियेचे नियोजन करा आदी मार्गदर्शन करुन जिल्हाकार्यांनी मुख्यधिकार्यांना या विकास कामांचे धडे दिले.
जिल्ह्यातील या नगरपरिषदां व नगरपंचायतीच्या शहरांमध्ये नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत २०५ कामे मंजूर असून प्राप्त निधी मार्च २०२४ अखेर खर्च करावा. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रातील कामांना प्राधान्य द्यावे. नागरी दलित वस्ती योजनेंतर्गत अनुसूचित, दलित घटकातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत. रमाई आवास योजना, पीएम-स्वनिधी योजना, केंद्र व राज्य शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात. पर्यावरणपूरक उपाययोजना राबवाव्यात, असे सांगून या नगरपंचायत, नगरपरिषद क्षेत्रातील विकासकामांचा दर महिन्याला सविस्तर आढावा घेण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.