लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी)APMC Election Result निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून १८ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळाला. यामुळे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव झाला असून, भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील या पँनलने मुरबाड `एपीएमसी'वरनिर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मुरबाडच्या राजकारणावर अनेक वर्षांपासून गोटीराम पवार यांचे वर्चस्व आहे. आता त्यांची ही धुरा चिरंजीव सुभाष पवार यांनी घेतली आहे. २००९ नंतर मुरबाडच्या राजकारणात पदार्पण केलेले किसन कथोरे यांना आमदारकी हाती असूनही चौदा वर्षानंतरही एपीएमसीवरील गोटीराम पवारांचे वर्चस्व मोडता आलेले नाही. आतापर्यंत बाजार समितीच्या झालेल्या सर्व निवडणुकात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत राज्यात शिवसेना व भाजपा एकत्रित असल्यामुळे मुरबाड एपीएमसी निवडणुकीत युतीची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात शिवसेना-भाजपामध्ये चर्चाही झाली होती. शिवसेनेने भाजपाला सहा जागा देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. भाजपाने सुरुवातीला सहा जागांवर मान्यता दिली. मात्र, अचानक आणखी एका जागेची मागणी केल्यामुळे युती फिसकटली.
`एपीएमसी'ची निवडणूक चुरशीची होत असल्याचे चित्र निर्माण केले जात होते. मात्र, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांनी नियोजनबद्ध व्यूहरचना केली. त्यामुळे भाजपाला संधी मिळाली नाही. या मतमोजणीत शिवसेनेच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेला १८ पैकी १५, तर भाजपाचे कथोरेंना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.