वासिंद : गरीब, आदिवासी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर फळवृक्ष रोपण व संवर्धन करून त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनातून रोजगार आणि फळांच्या आहारातून कुपोषणावरही मात करता येईल हा दुहेरी हेतू साधून कृषितज्ज्ञ तथा काँग्रेसचे सेवादल राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश भांगरथ यांनी हा 'मॉडेल प्रयोग' हाती घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यात या फळझाड लागवडीला सुरुवात करून यामध्ये ५८ हजार फळरोपांची लागवड करण्यात आली आहे, तर हा मॉडेल प्रयोग ठाणे-पालघर जिल्ह्यांत राबविण्याचा संकल्प प्रा. डॉ. प्रकाश भांगरथ यांनी केला आहे.
ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला रोजगाराचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो. त्यातच दोन्ही जिल्ह्यांत कुपोषणचे प्रमाणही दिसून येते. काही ठिकाणी अनेक पडक्या जमिनी आहेत. त्या मोकळ्या पडून असलेल्या जागेवर फळझाडांची लागवड करून फळांचे उत्पन्न घ्यावयाचे, तर त्यातूनच रोजगार निर्मिती व फळांचा आहारात समावेशमुळे वाढते कुपोषण थांबण्यास मदत होईल या दुहेरी हेतूने हा फळझाडांचा ‘मॉडेल प्रयोग’ सुरू करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यातील कृष्णाची, काटेची, मोहडुंळ, आंबेची या वाडींमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या जवळजवळ चारशे एकर पडीक जमिनीवर ५८ हजार फळझाडांची लागवड करण्यात आली असल्याचे प्रकाश भांगरथ यांनी सांगितले. काहीजणांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ओल्या पार्ट्यांऐवजी फळ व इतर वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे, जेणेकरून पर्यावरणाचा संतुलन राखला जाईल. त्यातच रोजगार निर्मितीस मदत मिळून कुपोषणावरही मात करता येईल, असे भांगरथ यांनी व्यक्त केले.