- जितेंद्र कालेकरअहमदाबाद मार्गावरील वर्सोवा नाका येथून जंगलात जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेचा जळालेला मृतदेह काशिमीरा पोलिसांना मिळाला. तिची ओळख पटू नये म्हणून डोक्यात दगड टाकून अत्यंत निर्घृण खून केल्यानंतर मृतदेह तिथलाच पालापाचोळा टाकून जाळलेला होता. खून झालेली महिला आणि मारेकरी यांचा काहीच धागादोरा नव्हता. जवळच अर्धवट जळालेल्या चिटोऱ्यावर एक फोन नंबर मिळाला. त्याआधारे ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने या खुनाचा छडा लावला. अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर लग्नासाठी तगादा लावणाºया नालासोपारा भागातील या महिलेचा तिच्याच एका विवाहित मित्राने खून केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलीसही थक्क झाले.घोडबंदर खिंड येथे वर्सोवा नाका येथून मुंबई अहमदाबाद राष्टÑीय महामार्गालगतच्या जंगलात २५ फूट आतील भागात एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये काशीमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश ढाकणे यांना १६ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मिळाला. याप्रकरणी हत्या आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा पोलीस नाईक नामदेव ढाकणे यांनी अनोळखी आरोपीविरुद्ध दाखल केला. मीरारोडचे उपविभागीय अधिकारी शांताराम वळवी, काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगार आणि उपनिरीक्षक अमित पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या खुनाच्या तपासासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी वेगवेगळी पथके तयार केली. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेकडेही समांतर तपासाचे आदेश त्यांनी दिले. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, जमादार अनिल वेळे, हवालदार चंद्रकांत पोशिरकर, संदीप शिंदे, किशोर वाडिले, नाईक अशोक पाटील, संजय शिंदे , अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, सचिन सावंत, तसेच पोलीस शिपाई राजेश श्रीवास्तव, सतिश जगताप आणि महेश वेले आदींचे संपूर्ण पथक आणि काशिमीराचे निरीक्षक शिंगारे यांचेही एक पथक या प्रकरणाच्या तपासासाठी कामाला लागले.सर्वप्रथम संपूर्णपणे जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. बाजूलाच पडलेल्या तिच्या ब्लाउजमध्ये एक व्हीजिटिंग कार्ड मिळाले. यावर एक मोबाइल नंबर लिहिलेला होता. तो नालासोपाºयातील प्रीती नावाच्या महिलेचा होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने प्रीतीचा शोध घेतला. शेजारी राहणाºया ४७ वर्षीय निर्मला भाभीला हे कार्ड दिले होते, असे तिने पोलिसांना सांगितले. निर्मला भाभी पुण्याला जाताना मी माझा मोबाइल नंबर दिला होता. पुण्याला पोहोचल्यावर फोन कर, असे प्रीतीने तिला सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती सचिन यादव याचा शोध घेतला. तिच्या साडीची अर्धवट जळालेली किनार आणि पायातील पैंजणाच्या आधारे त्याने तो मृतदेह निर्मलाचाच असल्याचे ओळखले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असता, सचिन यादव हा तिचा पती नसून, निर्मला आणि तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले. सुरुवातीला सचिनही तपास पथकाच्या रडारवर असल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. आपण हा खून केला नाही, पण तिच्यावर खूप प्रेम असल्यामुळे आम्ही दोघेही एकत्र राहत असल्याचे त्याने सांगितले.निर्मला मूळची मुंबईच्या खारदांड्याची. पतीला दारूचे व्यसन. क्षुल्लक कारणावरून तो नेहमीच भांडत असल्यामुळे त्याच्यापासून ती वेगळी झाली. पतीपासून विभक्त झालेली आणि देखणी असलेली मराठी भाषिक निर्मला त्याच परिसरात राहणाºया सचिन यादवच्या नजरेत आली. दोघांचीही मैत्री झाली. या संबंधांची परिसरात चर्चा होऊ नये म्हणून, दोघेही पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील श्रीरामनगर भागात वास्तव्य करू लागले. लग्न न करताच पती, पत्नीप्रमाणे लिव्ह इन रिलेशनमध्ये ते राहू लागले. तो रिक्षाचा व्यवसाय करीत होता. त्याला हातभार लावण्यासाठी तिने किराणा दुकान सुरू केले. आपल्याला चांगला जोडीदार मिळाल्यामुळे ती समाधानी होती. पत्नीचे सुख देणारी सहचारिणी लाभल्यामुळे तोही खूष होता. त्याचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते. नऊ वर्षांपासून त्यांचा हा संसार सुरू होता. कुठेतरी दृष्ट लागावी, तसा अबरार मोहम्मद शेख (२७) हा नकळत तिच्या जीवनात आला. नालासोपाºयातील बिलालपाड्यात राहणाºया अबरारची सासूरवाडी श्रीरामनगर भागातील निर्मलाच्या किराणा दुकानापासून जवळच होती. सुरुवातीला सिगारेट खरेदीच्या निमित्ताने तिच्या दुकानात अबरारचे येणे झाले. तिच्या सौंदर्याने घायाळ झालेला अबरार नंतर तिच्याकडे येण्यासाठी बहाणे शोधू लागला. सचिन घरी नसताना अबरार नेहमीच गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे यायचा. यातूनच सचिनपेक्षा पिळदार शरीरयष्टीच्या, त्यातही अवघ्या २७ वर्षांच्या कोवळ्या अबरारकडे ती कधी आकृष्ट झाली, हे तिलाही कळले नाही. मग, आपल्या मनासारखे होत गेल्यामुळे सचिन कधी घराबाहेर पडतो, याची तो वाटच पाहायचा. कधी कधी तर तो यईपर्यंतही दोघांना भान नसायचे. अचानक सचिन आला की लगेच दोघेही शांत व्हायचे किंवा खुबीने गप्पांमध्ये विषयांतर करायचे. अशाच गप्पांच्या ओघात आपण विवाहित असल्याचेही अबरारने तिला सांगितले होते. त्यामुळे आपण लग्न न करता ‘टाइमपास’ करीत असल्याचेही त्याने अप्रत्यक्षपणे तिच्या लक्षात आणून दिले होते. मुळात सचिनही लग्न न करताच तिच्याबरोबर वास्तव्य करीत असल्यामुळे त्याने अबरार आणि निर्मलाच्या अनैतिक संबंधांकडे काहीसे दुर्लक्ष केले. नऊ वर्षांपासून सचिनबरोर जरी ती वास्तव्य करीत असली, तरी सचिनपेक्षा तिला आता अबरार जवळचा वाटू लागला. त्यामुळे लपूनछपून असले ‘संबंध’ ठेवण्यापेक्षा अधिकृतपणे अबरारशी लग्नाचा हट्ट तिने केला. अबरारला मात्र तिच्याकडून फक्त शारिरीक भूक भागवून घ्यायची होती. तो लग्नासाठी फारसा प्रतिसाद देत नसल्यामुळे तिने त्याच्याकडे तगादाच लावला. तेव्हा आपण विवाहित असून दोन मुलेही असल्याचे त्याने तिला ठणकावून सांगितले. आपला गेल्या वर्षभरापासून त्याने केवळ वापर केल्याचे लक्षात आल्यावर ती संतापली. लग्न केले नाही, तर त्याच भागात राहणाºया सासºयाला आणि बिलालपाड्यात राहणाºया त्याच्या पत्नीलाही या ‘संबंधा’बाबत सर्वकाही सांगण्याची धमकीच तिने दिली. तिच्या धमकीने अस्वस्थ झालेल्या अबरारला तिचा प्रचंड तिटकारा येऊ लागला. शेवटी, तिचा काटा काढून ही ब्याद कायमची संपवायची, अशी खूणगाठच मनाशी त्याने बांधली.१५ जानेवारी २०१९ रोजी त्याने लग्नाची बोलणी करण्याचा बहाणा करून निर्मलाला घोडबंदर रोडवरील वर्सोवा भागातील फाऊंटन हॉटेलजवळ निर्जनस्थळी बोलविले. मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नासाठी नालासोपारा येथून पुण्याला जात असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात आल्याचे तिने अबरारला फोनवरून सांगितले. पण, तो लग्नाला तयार झाल्याच्या भाबड्या आशेने ती बोलविलेल्या ठिकाणी निघाली. ठाण्यातून घोडबंदर रोडने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ती फाउंटन हॉटेलजवळ आली. रात्री ९.३० वाजता ते दोघेही भेटले. दरम्यान, पोलिसांच्या तपासातही तिने अलीकडेच नवीन मोबाइल घेतल्याचे उघड झाले. तिचा मृतदेह मिळाल्याच्या दुसºया दिवशी तो मोबाइल सुरू झाला. त्यामुळे पती म्हणून तिच्यासोबत राहणारा सचिन या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत संशयाच्या भोवºयात होता. एक महिन्यापूर्वी तिचा मोबाइल चोरीला गेल्यामुळे तिने नवीन मोबाइल घेतला होता. जो मोबाइल तिच्याकडे होता, त्याचे संपूर्ण सीडीआर (कॉल डिटेल्स) पोलिसांनी तपासले. तेव्हा शेवटी ती अबरारच्याच संपर्कात होती, हे स्पष्ट झाले. ज्यावेळी ती ठाणे ते घोडबंदर दिशेने येत होती, त्याचवेळी अबरारही वसई ते घोडबंदरच्या दिशेने येत असल्याचे कॉल डिटेल्स पोलिसांना मिळाले. अबरार हा दोन मुलांचा पिता असल्याचे समोर आले. दोघांच्याही वयातील अंतरामुळे संशयाला जागा नव्हती. आपण घरी आलो की, दोघेही गप्पा मारता मारता शांत होतात, हा सचिनने दिलेला एक धागा. याशिवाय, कॉल डिटेलमध्ये तिला त्याने केलेला सर्वात शेवटच्या कॉलमुळे अबरारवरच तपास पथकाने लक्ष केंद्रित केले. तो बिलालपाडा भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक टेलर यांच्या पथकाने त्याला २१ जानेवारी २०१५ रोजी सापळा रचून पकडले. सुरुवातीला सचिननेच तिला मारण्याची सुपारी दिल्याची कथा रंगविली. सर्व पुरावे त्याला दाखवल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. वयाने मोठ्या असलेल्या निर्मलाशी एक वर्षभरापासून त्याने अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. तिने पत्नी आणि सासºयाला सर्वकाही सांगण्याची धमकी देत लग्नाचा तगादा लावला होता. तिला घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेलजवळील जंगलात बोलावून घेतल्यानंतर तिथेही दोघांमध्ये संबंध आले. नंतर जवळच्याच एका दगडाने तिच्या डोक्यावर प्रहार करीत अबरारने तिचा खून केला. पुण्याला जाण्यासाठी तिने नेलेल्या बॅगेतील साड्या आणि इतर कपडे, तसेच जवळच्या पालापाचोळ्याने पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने तिचा मृतदेह पेटवून दिल्याची कबूलीही त्याने दिली. हे दोघेही जंगलाच्या दिशेने जाताना एका व्यक्तीने त्यांना पाहिले होते. घटनास्थळी मिळालेल्या कार्डवरील मोबाइल क्रमांक आणि सचिनची माहिती, तसेच दोघांचेही कॉल डिटेल्सच्या आधारे या खुनाच्या गुन्ह्याचा अखेर छडा लागला. एका क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंधळे, सहायक
अनैतिक संबंध बेतले जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:41 AM