ठाणे : घरातील रद्दी गोळा करून त्यातून उभा राहणाऱ्या पैशातून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या द पेपर रिव्हॉल्युशन फाउंडेशनचा पाच वर्षांचा प्रवास वर्धापनदिनी उलगडण्यात आला. यावेळी आजारपणात हात-पाय गमावूनदेखील हिंमत न हारता विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या प्रतिभाशाली वर्गाच्या प्रमुख शिक्षिका यांना शिक्षकदिनी मानवंदना देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
रद्दीतून वंचित घटकांना शिकवले जाते हे दाखवून देणारी द पेपर रिव्हॉल्युशन फाउंडेशनचा रविवारी नातू परांजपे सभागृहात पाचवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. संस्थेने पाच वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा घेत लॉकडाऊनमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणले, तसेच वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुलांनादेखील शिक्षण देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या भारतीय कबड्डी संघाच्या माजी कर्णधार अभिलाषा म्हात्रे म्हणाल्या की, सोशल मीडियावर तरुण पिढी भरकटत असताना दुसरीकडे अशा संस्थांच्या माध्यमातून काम करणारी तरुण मंडळीदेखील आहे. दुसऱ्याच्या मेहनतीवर अवलंबून राहू नका असे सांगताना त्यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन केले. खेळण्यासाठी शरीरात ताकद असावी म्हणून आम्ही योग्य आहाराचे पालन करतो. पण ताकद ही मनात असावी लागते हे हिलीम यांच्याकडे पाहून कळते, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. दरम्यान, प्रतिभाशाली वर्गातील आदिवासी पाड्यातील मुलांनी गाण्यांच्या माध्यमातून कविता सादर केल्या. यावेळी कोरोनायोद्धा किरण नाकती, कपिल मांढरे, किशोर म्हात्रे यांना निःस्वार्थी सेवा सन्मानाने गौरविण्यात आले. तसेच, पत्रकार प्रज्ञा म्हात्रे आणि संदीप लबडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका वंदना परांजपे यांनी संस्थेत कार्य करणाऱ्या तरुण पिढीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रणव पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत संस्थेच्या टीमचे कौतुक केले. सूत्रसंचालन पूजा पाटील, नीता बनगे यांनी केले.