भिवंडी: पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ ऑक्टोंबर रोजी चोरीच्या उद्देशाने मुंबई पोलीस दलातील जवानाने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोघा युवकापैकी अजीम अस्लम सय्यद वय ३० वर्ष या युवकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सोमवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दिपाली धाटे,उपअधीक्षक प्रशांत ढोले,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे,भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बायेस उपस्थित होते.
या गोळीबार प्रकरणी अटक केलेला आरोपी सुरज देवराम ढोकरे हा मुंबई पोलीस दलातील शस्त्रागार विभागात कार्यरत होता.या घटने पूर्वी सूरज ढोकरे हा सप्टेंबर महिन्या पासून एकूण चार वेळा अंबाडी ते वासिंद या पाईप लाईन मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर आला होता असे तपासात निष्पन्न झाले आहे.त्या दरम्यान त्याने कोणाला लुटले होते का याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.आरोपी ढोकरे याला ऑनलाईन गेमचे वेड असल्याने त्यावर सुमारे ५१ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.
गोळीबार केल्याच्या दिवशी त्याच्याकडे कर्जाच्या हप्त्यासाठी मोबाईल फोन करून तगादा लावला होता.त्या मधून त्याचा त्रागा झाल्याने त्याने हा आडवाटे च्या चोरीचा मार्ग अवलंबला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक देशमाने यांनी दिली आहे. सात दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर आरोपी सूरज ढोकरे यास भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असल्याची माहिती देखील देशमाने यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.