तलासरी : गर्भवती महिलेला दवाखान्यात उपचाराची गरज असताना तिला भगताकडे नेऊन उपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना तलासरी तालुक्यातील आमगाव डोंगरीपाडा येथे घडली.
आमगाव डोंगरीपाडा येथील सपना दीपेश वरठा (वय २०) या आठ महिने गर्भवती महिलेस उपचारांसाठी वेदांत रुग्णालयात रविवारी सकाळी दाखल केले होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान तिच्या घरच्यांनी तिला रुग्णालयातून घरी नेले. यावेळी डॉक्टरांनी सपनाला उपचारांची गरज आहे, तिला रुग्णालयातच ठेवा, असे सांगितले, पण त्यास न जुमानता डिस्चार्ज घेण्यात आला. सपनाला घरी घेऊन गेल्यावर सोमवारी रात्री तिचा घरी मृत्यू झाला. याची माहिती मिळताच आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका तसेच आशाबाई सपनाच्या घरी गेल्या असता सपनाला दवाखान्यातून घरी आणून तिच्यावर भगताकडून उपचार केल्याची माहिती त्यांना मिळाली. सपनाचा मृतदेह तलासरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
...अन्यथा तिचा जीव वाचला असतासपनावर भगताकडून उपचार करण्याऐवजी दवाखान्यात उपचार केले असते तर तिचा जीव वाचला असता, तसेच वेदांत रुग्णालयाकडूनही गर्भवती महिलेला तिची परिस्थिती गंभीर असताना डिस्चार्ज घेऊन घरी नेल्याची माहिती तलासरी आरोग्य विभागाला दिली असती तरीसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून योग्य ती उपाययोजना करण्यात आली असती, असे तलासरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेश पटेल यांनी सांगितले.
ग्रामीण भागांत भोंदूबाबांचा पगडातलासरी परिसरातील एका महिलेला तुझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लावतो, असे सांगून एका भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच भगताकडून उपचार केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तलासरी तालुक्यात आदिवासी समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धा, भोंदूबाबा, भगत यांचा पगडा असल्याचे दिसून येते.