ठाणे: वाघबीळनाका येथे घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर मोटारसायकलीवरून घरी जाणाऱ्या एका खासगी आयटी कंपनीतील टीम लीडर सेंचेज पिकॉक (२८, रा. नेट को-ऑप. सोसायटी, धोबीआळी, ठाणे) याचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पोचालक टुनटुन डांगरराम पाल (२६, रा. पडघा, भिवंडी, ठाणे) याला अटक केल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
पिकॉक हे रात्रपाळीवरून आपल्या कंपनीतून घोडबंदर रोडने मोटारसायकलीवरून धोबीआळीतील आपल्या घरी जात होते. गुरुवारी सकाळी ७.३५ वाजताच्या सुमारास वाघबीळनाका येथे त्यांच्या पाठीमागून आलेल्या टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेमुळे मोटारसायकलीवरून ते खाली कोसळले. यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने कासारवडवली पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यांना दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरघाव वेगाने टेम्पो चालवून पिकॉक यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रामपाल याच्याविरुद्ध कलम ३०४ - अ, २७९ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र फड आणि जे. एस. व्हनमाने यांनी टेम्पोचालक रामपाल याला अटक केली आहे.
सेंचेज होता टीम लीडर
सेंचेज हा कासारवडवली येथील घोडबंदर रोडवरील जी कॉर्प टेक पार्क या आयटी कंपनीत टीम लीडर होता. गुरुवारी रात्र पाळी संपवून तो घरी जात असतानाच त्याच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांसह कंपनीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.