ठाणे- शहरातील वागळे इस्टेट परिसरातील कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमधील सांडपाण्याच्या टाकीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या टाकीमध्ये एक भटका कुत्रा पडल्यामुळे त्याला काढतांना सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अनोळखी पुरुषाचाही मृतदेह मिळाल्याने या वसाहतीत घबराटीचे वातावरण पसरले आहे. संत ज्ञानेश्वरनगरजवळ असलेल्या या कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमधील इमारत क्रमांक सातच्या समोरच जुनी बंद असलेली पडकी सांडपाण्याची टाकी आहे. याच टाकीतून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. परंतू, टाकीतील घाणीमुळे ही दुर्गंधी येत असल्याचा समज येथील वसाहतीमध्ये होती. सोमवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास एक भटका कुत्रा या टाकीत पडला. त्याच्या सततच्या भुंकण्यामुळे स्थानिक मुलांनी त्याला कसेतरी बाहेर काढले. त्याचवेळी त्या टाकीत एक मृतदेह असल्याचेही आढळले. ही माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सुमारे ५० फूट लांब आणि १५ ते १८ फूट खोल टाकीतून अग्निशमन दल आाणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.
या टाकीत पाणीही काही प्रमाणात असल्याने ते आधी सक्शन पंपाच्या मदतीने उपसल्यानंतर मृतदेह व त्याचे अवशेष या टाकीमधून बाहेर काढण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हा मृतदेह पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात आलेला एखादा मद्यपी या टाकीत पडला किंवा त्याला कोणी मारुन टाकले, या सर्व बाबीचा तपास केला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले.