नितिन पंडीत -
भिवंडी- केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर या त्यांच्या मूळगावी झाला. गावात भव्य स्वागत झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबियांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथील ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच खुर्चीस वंदन केले.
यावेळी पाटील भावनीक झाल्याने त्यांना गहिवरून आले होते. कपिल पाटील यांनी १९८८ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा दिवे अंजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून केला होता. यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विविध पदे भूषवित थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाला गवसणी घातली.
ग्राम पंचायत सरपंच ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्नसुध्दा मी कधी पाहिले नव्हते. परंतु गावाच्या ग्रामस्थांनी १९८८ मध्ये व्यक्त केलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरविल्याने कुटुंबियांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाची पोच पावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने, ही संधी मला मिळाली, अशी प्रतिक्रिया देत वर्षानुवर्षे स्थित्यंतर होत गेली, आधुनिक खुर्ची आली असली तरी सरपंच पदाची मी उपभोगलेली ही खुर्ची असल्याने त्यास वंदन करण्यास आपण आलो असल्याचे मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
पाच दिवस जन आशीर्वाद यात्रेचा समारोप करीत असतानाच तब्बल दीड महिन्यानंतर आपल्या घरी परतणाऱ्या कपिल पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.