भिवंडी : वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट परीक्षा घेतली जाते परंतु या परीक्षेतील तांत्रिक चुकीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न भंगले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपली कैफियत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर मांडली. त्यावेळी, त्यांनी तातडीने पावले उचलत या बाबत मार्ग काढल्याने नुकसान झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण दिसत असल्याने मंगळवारी पालकांसह विद्यार्थ्यांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले.
१७ जुलै रोजी नीटची परीक्षा देशभरात पार पडली.या वेळी ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल या परीक्षा केंद्रासह काही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांचे संच दिले.विद्यार्थ्यांनी या गोंधळा बाबत तक्रार केल्या नंतर हिंदी प्रश्नसंच काढून घेत इंग्रजी प्रश्नसंच दिले गेले परंतु उत्तरपत्रिका संच हिंदीच ठेवल्याने दोन्हीवरील अनुक्रमणिका जुळत नसल्याने विद्यार्थ्यांचा पुन्हा गोंधळ झाल्याने ऑप्टिकल मार्क रेकग्निशन ओएमआर जुळत नसल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन वैद्यकीय प्रवेशा पासून ते विद्यार्थी मुकणार होते.असे असतानाही सायंकाळी ८ वाजे पर्यंत मुलांना परीक्षा केंद्रावर थांबवून त्यांच्या कडून परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असून कोणताही त्रास झाला नाही असे लिहून घेण्यात आले होते.
या परीक्षेचा निकाल ३१ ऑगष्ट रोजी जाहीर झाला.परंतु त्यामध्ये या परीक्षा केंद्रावरील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला नाही.व उत्तरपत्रिकाहि पाहण्यास उपलब्ध झाली नाही. त्यामुळे भयग्रस्त झालेल्या पालकांपैकी अलका पालकर यांनी केंद्रीय पंचयातराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.कपिल पाटील यांनी तात्काळ नीट परीक्षेचे प्रमुख संचालक मणिपूर येथील विनीत जोशी यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला व त्या मधून मार्ग काढण्याची मागणी करीत पाठपुरावा केल्या नंतर नीट परीक्षा मंडळाने प्रथम त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दिला.परंतु वेळे अभावी तो दिलेला प्रस्ताव व्यवहार्य नसल्याने अखेर विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे मार्क व आताचे मार्क यापैकी अधिक असलेले मार्क ग्राह्य धरण्याचा बेस्ट ऑफ टू अथवा पुनः परीक्षा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण दिसून येत आहे.त्यामुळे मंत्री कपिल पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया परीक्षार्थी रौनक राजेंद्रन व पालक अलका पालकर यांनी दिली आहे.
मी काही वेगळं केलं नसून अन्याय झालेले पालक व विद्यार्थी वेळेत माझ्याकडे आल्याने मी त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे हा प्रश्न लावून धरला.वेगळं काही नाही केलं पण लोकप्रतिनिधी म्हणून जे करणं शक्य होत ते केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यात यशस्वी झालो याचे समाधान आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.