ठाणे : रिदम म्युझिक अकॅडमी, ठाणे व श्री आनंद भारती समाज, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आनंद भारती समाज सभागृहात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात तबला आणि पखवाजची जुगलबंदी रंगली तर सारंगी वादनाने रंगत आणली.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तबला गुरु पंडित बाळ सुपटकर यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांचा त्यांच्या शिष्यांनी सत्कार केल्यानंतर अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकल आणि समुह वादन केले. त्यात यश ज्योष्ठे, रोहीत सिनलकर, ओमकार मालुसरे, सिद्धांत मोहीते, यश सुपटकर, सौमिल चव्हाण, तन्वी शिंदे, प्रणव कोळी, सोहम गायकवाड, दुर्वेश कोळी आदींचा समावेश होता. त्यांनी ताल त्रितालमध्ये कायदे, तुकडे आणि तिहाई वादन केले. त्यानंतर रंगली ती तबला आणि पखवाजची जुगलबंदी. या जुगलबंदीत शेखर सुपटकर व योगेश जगताप यांनी ताल त्रितालमध्ये झपताल, एकताल, काही तुकडे, चलन, कायदे, रेले सादर केले. शेवटी सवाल जवाब झाले. पटवर्धन यांनी एकल सारंगीवादन केल्यानंतर कार्यक्रमाचा भैरवीने शेवट केला. यावेळी त्यांना खुद्द बाळ सुपटकर यांनी तबला साथ दिली. पटवर्धन यांनी भीमपलासी राग सादर केला. या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. या प्रसंगी श्री आनंद भारती समाजाचे कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर, जेष्ठ तबलावादक डॉक्टर के. व्हि. मुठे, ह भ.प. प्रमोद भोपी, म्युझिक कंपोझर विवेक मोरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. माधुरी कोळी हिने सूत्रसंचालन केले.