बदलापूर : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गीतांबरोबरच त्यांची पाच भावचित्रे साकारण्याचा बदलापूरमध्ये रविवारी रंगलेला अनोखा ‘चित्रसंगीत’ कार्यक्रम रसिकांसाठी खास मेजवानी ठरली. लतादिदींच्या गाण्यांवर त्यांच्या पाच वेगवेगळ्या भावमुद्रा रेखाटून चित्रकार सचिन जुवाटकर यांनी बदलापूरकरांना वेगळा अनुभव दिला. कुंचला आणि संगीताची ही जुगलबंदी नऊ तास रंगली होती.प्रसिद्ध संगीतकार लहू - माधव (लहू पांचाळ व माधव आजगावकर) यांच्या हस्ते कार्यक्र माचे उद्घाटन झाले. लहू पांचाळ यांनी गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया हे गीत सादर केले. याच गीताच्या पार्श्वभूमीवर सचिन जुवाटकर यांनी पंडित दीनानाथ मंगेशकर व लतादीदी यांची भावचित्रे रेखाटली.जुवाटकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. सलग नऊ तास कार्यक्र म सादर करून लतादीदींना मानाचा मुजरा करण्यात आला. सकाळी दहा ते सायंकाळी सात दरम्यान या अनोख्या मैफिलीचे आयोजन भाजपचे नगरसेवक किरण भोईर व अमित भोईर यांनी केले होते. सायंकाळी याच चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे, भाजपचे शहर अध्यक्ष संभाजी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शरद तेली, नगरसेवक प्रशांत कुलकर्णी, नगरसेविका रूचिता घोरपडे, प्रणिती कुलकर्णी, मिलिंद धारवडकर, उत्तम विशे, चित्रकार रवी काळे, भगवान भोईर, सागर घोरपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कला, मग ती कोणतीही असो ती देवाने दिलेली फार मोठी देणगी आहे. सचिन जुवाटकर यांनी असे उपक्र म सातत्याने राबवून कलेला फार मोठे प्रोत्साहन दिले आहे. जुवाटकर हे फार मोठे चित्रकार झाले याचा आम्हाला अभिमान वाटतो, अशा शब्दात प्रसिद्ध संगीतकार माधव आजगावकर यांनी आपल्या मनोगतात जुवाटकर यांचे कौतूक केले. आपल्याला अवगत झालेली कला पुढच्या पिढीला देण्याचे कार्य कलाकार आपल्या कलेतून करत असतात असेही त्यांनी सांगितले.या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे आदी मान्यवरांच्या व्यक्तिरेखा अशाच चित्रसंगीत या संकल्पनेवर साकारल्या आहेत. लतादीदींच्या आजवरच्या सांगीतिक सेवेला या अनोख्या चित्रसंगीत कार्यक्र माद्वारे मानाचा मुजरा करण्यात येत असल्याचे जुवाटकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. चित्र आणि संगीत यांचा अनोखा संगम साधून नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्र म नियमित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. बदलापूरकर रसिकांनी भरभरून प्रोत्साहन, आशीर्वाद व प्रेम दिले म्हणूनच मी ही प्रगती करू शकलो असे उदगार त्यांनीकाढले.
बदलापूरमध्ये रंगली अनोखी चित्रसंगीत मैफल, रसिकांसाठी ठरली खास मेजवानी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:56 PM