ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. अमोल गिते यांच्या वतीने सर्वसामान्य वाहनचालकांसाठी शुक्रवारी विनामूल्य कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ रिक्षाचालक, महिला रिक्षा चालक, ट्रक ड्रायव्हर आदी लाभ घेणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या नियमित कामाबरोबरच सामाजिक जाणिवेतून या शिबिराचे आयोजन केले आहे.
वाहन चालक हे कोरोना काळातही आपले काम करीत आहेत. त्यातही रिक्षा चालक हे सार्वजनिक वाहतूक करीत असल्याने त्यांचा दैनंदिन अनेक प्रवाशांशी संबंध येतो. त्यामुळे चालक आणि रिक्षा चालकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यांच्यात लसीकरणाबाबत जागृती करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा चालक व ट्रक चालकांसाठी हे विनामूल्य लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महिला रिक्षा चालकांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि सेवाभावी संस्थाही सहभागी आहेत. हे शिबिर लुईसवाडी ठाणे येथील नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भरविण्यात आले आहे.