डोंबिवली : अनेकांना झाडे लावण्याची आवड असते. मात्र, त्यांची काळजी कशी घ्यावी, कोणती खते वापरावीत, त्यांची निगा कशी राखावी, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. जिवापाड जपलेली झाडे कापून फेकताना त्यांच्या जीवावर येते. झाडे खूप जास्त झाली तर कुणाला देऊ, खूप बिया, कंद आहेत, कुणाला देऊ, या सगळ्या प्रश्नांवर उपाय म्हणून ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम भारतीय मजदूर संघ आणि ठाणे जिल्हा पर्यावरण मंचच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.
भारतीय मजदूर संघ - ठाणे जिल्हा पर्यावरण मंचच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवली परिसरांतील निसर्ग आणि वनस्पतीप्रेमी मंडळींसाठी ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम चालवला जात आहे. याबाबतची पहिली बैठक महाराष्ट्रदिनी मजदूर संघाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला वृक्षप्रेमी उपस्थित होते. भरत गोडांबे (पर्यावरण मंच प्रभारी- कोकण विभाग) यांनी झाडांच्या भिशीची संकल्पना बैठकीत मांडली. बैठकीला उपस्थित असलेल्या डॉ. मंगल तिवारी आणि इतरांकडून काही सूचना आल्या. या समूहाच्या वतीने झाडांविषयी जास्तीतजास्त जनजागृती करण्यात येईल.
रोपे, बिया, कंद यांचे प्रत्यक्ष आदानप्रदान करणे, बागकामाविषयी दरआठवड्याला नवीन माहिती दिली जाईल. पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, झाडांची निवड याविषयी माहिती देणे, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन आणि त्यापासून खतनिर्मिती याविषयी माहिती देणे, प्रत्येक सभासदाने आपल्याकडील झाडांची यादी करणे आणि ग्रुपवर पोस्ट करणे, वृक्ष आधारित पुस्तकांचे एक छोटेखानी ग्रंथालय तयार करणे, आपण ज्या परिसरात राहतो तेथील झाडांची यादी करणे, जेणेकरून आपल्याकडे हरित संपत्तीची नोंद होईल, असे या बैठकीत ठरवण्यात आले. बैठकीच्या शेवटी अश्विनी साने यांनी आपण जास्तीतजास्त लोकांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करू आणि आपली झाडे लावण्याची आवड जोपासू, असे सांगितले.
जे आपल्याकडे आहे ते इतरांना द्या, त्यांच्याकडे जे चांगले आहे, ते आपण घ्या’ या सहकार्याच्या भावनेतून चालणारा हा उपक्रम आहे.-भरत गोडांबे, प्रभारी कोकण विभाग, पर्यावरण मंच