ठाणे - 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ठाणे विश्रामगृहासमोर मनसेकडून ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोध प्रदर्शन करण्यात आले. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी तात्कालीन ब्रिटिश सरकारला "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"असे ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही या बेगडी पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या स्वकीयांच्या सरकारला "पारदर्शक मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"असा इशारा देत असं रवींद्र मोरे यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या मनांत या प्रक्रियेबद्दल अनेक शंका आहेत.पारदर्शकतेचा डंका पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी लोकभावनेचा आदर करून मतदान प्रक्रिया निःसंशय आणि पारदर्शक करावी अन्यथा हे आंदोलन उत्तरोत्तर आणखी तीव्र करण्यांत येईल याची सरकारने नोंद घ्यावी असेही मनसेकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मनसेने ईव्हीएम विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील ईव्हीएमच्या मुद्द्यावर मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या मोर्चासाठी अन्य राजकीय पक्षातील नेत्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी राज ठाकरे भेटीगाठी घेत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आगामी निवडणुकीत ईव्हीएम हटवा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. याआधी राज यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली तसेच कोलकात्याला जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट राज यांनी घेतली. मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आणखी आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे.
पाहा व्हिडीओ -