ठाणे : वृक्षांना राखी बांधून तसेच वृक्षारोपण करून ठाण्यातील शिवशांती प्रतिष्ठान आणि रुद्र प्रतिष्ठानने रविवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. आतापर्यंत एक हजार ६०० वृक्षांचे रोपण झाले असून रविवारी १६६वी वृक्षारोपण मोहीम यशस्वी केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंग यांनी दिली.
रविवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर वागळे इस्टेट परिसरातील सावरकरनगर येथील झाडांना राखी बांधून रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम पूर्ण करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विनयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला वृक्ष लागवडीचा उपक्रम निरंतर आयोजित केला जात आहे. रविवारी या संस्थेने वृक्षारोपणाची ही १६६वी मोहीम पूर्ण केली असून आतापर्यंत एक हजार ६०० रोपांची लागवड केली. बहिणी ज्याप्रमाणे स्वत:च्या संरक्षणासाठी आपल्या भावांना औक्षण करून राखी बांधतात, त्याचप्रमाणे मानव जातीच्या रक्षणासाठी झाडावेलींचे आभार मानून पर्यावरणाला राखी बांधली पाहिजे, असे आवाहन विनय सिंग यांनी यावेळी केले. यावेळी रंजीत सिंह, गोपाल ठाकूर आणि शिवशांती कुटुंबातील इतर सदस्यांनीही श्रमदान करून वृक्षारोपण केले.