ठाणे : सर्वंकष स्वच्छता अभियान (#DeepCleanCampaign) हे मुख्यमंत्र्याचे किंवा महापालिकेचे अभियान नसून ते जनतेचे अभियान आहे. हे स्वच्छता अभियान न राहता ती लोकचळवळ झाली पाहिजे, हे अभियान मुंबई, मुंबई महानगर, एमएमआरडी क्षेत्र असे करीत टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाण्यातील प्रदुषण तुलनेने कमी असून ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करावेत जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पध्दतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forst)तयार करावीत त्यामुळे हवेतील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. जिथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाही. आज बीएमसी पाईपलाईन येथे साठलेला कचरा साफ केला जातो आहे, त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करा, जेणेकरुन त्याचे दृश्यस्वरुप हे नागरिकांना दिसेल असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होवू नये यासाठी वाहतुकीचे नियोजन करावे, त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची (#DeepCleaningCampaign) सुरूवात आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून करण्यात आले. वागळे परिसरातील १८० ठिकाणी या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत सफाई कर्मचा-यांसोबतच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक अशोक वैती, एकनाथ भोईर, योगेश जानकर, डॉ. जिंतेद्र वाघ, माजी नगरसेवक एकता भोईर, संध्या मोरे, शिल्पा वाघ, मनिषा कांबळे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, संत निरंकारी सेवा मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ,विविध महाविद्यालयांचे एन.एस.एस, एन.सी.सी चे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: सहभागी झाले होते. तीन हात नाक्यावरुन मॉडेला नाका मार्गे वागळे मुख्य रस्ता, 16 नं. येथील बीएमसी पाईपलाईनवरील पूल, रोड नं. 21, रोड नं 22 येथील शिवसेना शाखा येथून चालत सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून रस्त्यांची सफाई केली तसेच फूटपाथवर पाण्याची फवारणी करुन फूटपाथ स्वच्छ केले.
या अभियानात सहभागी झालेल्या भजनी मंडळ, स्वच्छता स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, एन.सी.सी, एन.एस.एस, शालेय विद्यार्थी तसेच विविध धार्मिक संस्थामार्फत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना भेट देवून त्यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. स्वच्छता अभियानाचे ठाणे महानगरपालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विशेषतत्वाने नमूद केले. यावेळी सफाई कर्मचारी जयेश गायकवाड व अनिता शिरसाट यांचा प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.