कल्याण - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्र सुरू करणार आहोत. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होताच या उपकेंद्रात प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली. कल्याण उपकेंद्राची वास्तू तयार असतानाही त्याच्या उद्घाटनासाठी विद्यापीठाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे उपकेंद्राची जागा परत घेण्याचा इशारा केडीएमसी प्रशासनाने विद्यापीठाला दिला होता. त्याची दखल घेत डॉ. पेडणेकर यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये येऊन उपकेंद्राची पाहणी केली.डॉ. पेडणेकर यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि महापौर विनीता राणे यांची भेट घेतली. यावेळी कुलसचिव दिनेश कांबळे, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेश चंद्र, प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक महाजन उपस्थित होते.डॉ. पेडणेकर यांनी सांगितले की, विविध अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होताच २०१८-१९ या वर्षाकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. दूरस्थ शिक्षण विभाग प्रथम सुरू केला जाईल. त्याचबरोबर संगणक, विज्ञान शाखेचे प्रवेश सुरू केले जातील. विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र हे तातडीने सुरू व्हावे, यासाठी डॉ. नरेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन केली जाईल.
विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र यंदा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:44 AM