मुरबाड : मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड होत असल्याची तक्रार उपसरपंच भास्कर पतंगराव यांनी मुख्यमंत्री, वनमंत्र्यांकडे केली आहे.मोह, आंबा, जांभूळ, खैर, ऐन, साग, धावडा या वृक्षांची जफर शेख या कंत्राटदाराकडून बेकायदा तोड केली जात आहे. शेख याला एक ते दोन सर्व्हे नंबरची परवानगी घेऊन आजूबाजूच्या जमिनीवरील विनापरवाना तोड केली असल्याची तक्रार पतंगराव यांनी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सायले गाव हाद्दीतील खाते क्रमांक ४७९ मधील सर्व्हे नंबर १४०, १४१, १४३ व त्यांच्यातील हिस्सा नंबरमधील चार हेक्टर ३९ आर जागेतील खासगी जंगलात विनापरवाना वृक्षतोड केली असून, टोकावडे वन कार्यालयात गेले असता, तेथील वनाधिकारी यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे पतंगराव यांनी ऑनलाइन तक्रार केली. तक्रार करून एक महिना झाला, तरीही काहीही कारवाई झालेली नाही. उलट तक्रारदाराला कंत्राटदार व त्याची मुले जीवे मारण्याची धमकी देत असून, त्याबाबत पोलिसात तक्रारही केली.वनक्षेत्रपाल विकास भामरे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, जाफर शेख याने परवानगीपेक्षा जास्त वृक्षतोड केली असेल, तर रीतसर पंचनामा केला जाईल. अतिरिक्त झाडे तोडल्याचे निष्पन्न झाले, तर दंडात्मक कारवाई केली जाईल.प्रशासनाने तातडीने याबाबत चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार पतंगराव यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
आमदार किसन कथोरे यांनी मला तक्रार मागे घेण्यासाठी फोन केला होता, परंतु कंत्राटदार जाफर शेख व त्याची मुले यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असून, पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मी बेकायदा जंगलतोडीबाबत केलेली तक्रार मागे घेतलेली नसून शेखवर कारवाई होण्यासाठी ठाम आहे. - भास्कर पतंगराव, तक्रारदारतक्रार मागे घेतलीभास्कर पतंगराव यांनी दिलेली तक्रार आमदार किसन कथोरे यांच्या मध्यस्थीनंतर मिटविण्यात आली आहे. - जावेद जाफर शेख, कंत्राटदार