सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील वखारीची महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी पथकासह तपासणी केली असता, त्यांनी परवाना घेतला नसल्याचे उघड झाले. त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई केल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली आहे.
उल्हासनगरात लाकडी वखारी अवैधपणे सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यावर, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके, सुरक्षा विभागाचे प्रमुख सचिन वानखडे यांच्यासह पथकांनी मंगळवारी अनेक लाकडी वखारीची तपासणी केली असता, अवैधपणे वखारी सुरू असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे महापालिका परवाना, अग्निशमन विभागाचा परवाना यांच्यासह सुरक्षितेचा अभाव आढळून आला आहे. ९ पेक्षा जास्त लाकडी वखारींना नोटिसा देऊन, प्रत्येकी ११ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
शहरात ३० पेक्षा जास्त लाकडी वखारी असून त्याही विनापरवाना सुरू असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. महापालिकेच्या कारवाईने लाकडी वखार मालकांचे धाबे दणाणले असून राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील लाकडी वखार मालकांनी महापालिका परवाना, अग्निशमन विभागाचा परवाना घेतला नाही. त्याप्रमाणे शासन व वनविभागाचा परवाना आहे का? याची तापसणी करण्यात येणार असून वखारीत क्षमते पेक्षा जास्त लाकडे ठेवण्यात आली असून सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले आहे. महापालिका परवाना व अग्निशमन विभागाचा परवाना घेतला नसल्या प्रकरणी लाकडी वखारींना ५० हजार पेक्षा जास्त दंड आकारला जाऊ शकतो. अशी शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लाकडी वखारी विना परवाना का?
शहरात ३० पेक्षा जास्त लाकडी वखारी असून त्यांनी आतापर्यंत महापालिका परवानासह अग्निशमन विभागाचा परवाना का घेतला नाही. महापालिकेने याकडे दुर्लक्ष का केले? असे प्रश्न उपस्थित झाले आहे. वखारीची तपासणी झाल्यास, मोठे घबाड उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.