मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने सुरू केलेल्या कोरोना लसीकरण केंद्रात नगरसेवक चमकोगिरी दाखवण्यासाठी विनामास्क लुडबुड करीत आहेत. महापालिका प्रशासन नागरिकांना सर्व बंधने पाळण्याचे आवाहन करीत असून न केल्यास दंड करीत आहे. मात्र, नगरसेवक लसीकरण केंद्रातही निर्बंध पायदळी तुडवत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
लसीकरण केंद्रात विनामास्क फिरणाऱ्या नगरसेवकांना तेथील कर्मचारी अडवत नाहीत, याबद्दल नागरिकांनी नापसंती व्यक्त केली. सध्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. कोरोना लस घेतल्यावरही त्याचा प्रभाव दिसायला १४ दिवस जावे लागतात. असे असताना लसीकरण केंद्रात नगरसेवकांनी विनामास्क फिरणे म्हणजे कोरोनापासून बचाव करण्याकरिता लस घेण्यास आलेल्यांना कोरोनाचा आहेर देण्याचा प्रकार असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य लोकांना तेथे मोकाट फिरू देणे, लुडबुड करू देणे कितपत योग्य आहे, असे सवालही काही ज्येष्ठ नागरिक करीत आहेत. `मास्क नाही तर प्रवेश नाही` असे स्टिकर पालिकेने लसीकरण केंद्राबाहेर लावले आहेत. तरीही लोकप्रतिनिधी बिनधास्त फिरत आहेत.
.........
फोटो - मीरा रोड प्रभाग समिती कार्यालयातील लसीकरण केंद्रातील आहे. तेथे नगरसेवक मनोज दुबे, नगरसेविका सीमा शाह हे विनामास्क वावरताना दिसत आहेत.
.........
वाचली