मीरा रोड : काेराेनाचा फैलाव राेखण्यासाठी नियम घालून दिले आहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयातच नियम पायदळी तुडवले जात आहेत. महापालिकेने मुख्यालयात ‘नाे मास्क, नाे एंट्री’चे पत्रक लावण्यासाठी खर्च केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून माजी आमदारांसह नगरसेवक, राजकारणी आदी सर्रास विनामास्क प्रवेश करत आहेत. त्यांना राेखलेही जात नाही. त्यामुळे नियम माेडणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पालिका पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची दालने सील करण्याची मागणी आम आदमी पक्ष आणि नागरिकांनी केली आहे.
उपमहापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनातही कोणतेही पद नसणारी मंडळी तासन तास बसून असतात. त्यांच्यासाठी अधिकाऱ्यांना बाेलावून बैठका घेतल्या जात असल्याची तक्रार आम आदमी पक्षाचे ब्रिजेश शर्मा, नागरिक दिनेश नाईक आदींनी पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. तक्रारी करूनही महापौर, महापालिका व पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. मात्र, सर्वसामान्यांकडून मास्क न घातल्यास दंड वसूल करणारी पालिका व पोलीस पालिका मुख्यालयात विनामास्क फिरणाऱ्या राजकारण्यांविराेधात काहीच कारवाई करत नसल्याबाबत नाईक, शर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे. या बेजबाबदार लाेकांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, विनामास्क लोकांना बसवून गर्दी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची दालने सील करा, विना मास्क फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना पालिकेतील प्रवेश बंद करा आणि महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पुरावे म्हणून संरक्षित करून ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.