ठाणे: एका ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संदीपसिंग बेद (२२, रा. परबवाडी, वागळे इस्टेट, ठाणे ) या आरोपीला सात वर्षांच्या कारावासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ठाण्यातील परबवाडीतील जागृती मैदानासमोरील एका सार्वजनिक शौचालयात १५ मार्च २०१८ ते १७ मार्च २०१८ या कालावधीमध्ये संदीपसिंग याने या पिडित मुलावर दहा रुपये देण्याच्या अमिषाने अनैसर्गिक अत्याचार केला होता. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन १८ मार्च २०१८ रोजी आरोपी संदीपसिंग याला अटक केली होती.
याच खटल्याची सुनावणी १२ मार्च २०२४ रोजी ठाण्याचे विशेष पोस्को न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी विशेष सरकारी वकील विवेक कडू यांनी जोरदार बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपीला सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.