भिवंडी : भिवंडी महापालिकेची भुयारी गटार योजना नेहमीच चर्चेत येत असून, या गटार योजनेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. योजनेच्या कंत्राटदाराने शहरात ठिकठिकाणी खोदकाम केल्याने शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली असून, शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता शहरातील शांतीनगर भाजीमार्केट परिसरात भुयारी गटार योजनेचे काम करताना करण्यात आलेल्या खोदकामाने येथील सुमारे ५० ते ६० परिवारांची नळजोडणी कंत्राटदाराने तोडली आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी तोडलेल्या जोडणीचे काम केले नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तोडलेल्या नळजोडणीकडे पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने येथील महिलाांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसांत येथील तोडलेली नळजोडणी कंत्राटदार अथवा प्रशासनाने जोडले नाही तर महापालिकेच्या मुख्यालयावर महिला व नागरिकांचा हंडा मोर्चा काढू, असा इशारा मुश्ताक शेख यांनी दिला आहे. विशेष म्हणजे गटार योजनेचे काम करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी व समस्या होणार नाहीत याची खबरदारी संबंधित कंत्राटदाराने घेणे गरजेचे असल्याच्या लेखी सूचना पालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी वेळोवेळी देऊनही संबंधित कंत्राटदार सूचनांकडे दुर्लक्ष करून शांतीनगर भाजी मार्केट परिसरातील नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे.
---------------------
फोटो आहे