ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यात सुरू असलेल्या वाहतूककोंडीचा दारुण अनुभव शुक्रवारी पुन्हा आला. हजारो ठाणेकर चाकरमानी आणि शालेय विद्यार्थी कोंडीत अडकल्याने त्यांना कार्यालये, शाळा गाठण्यास विलंब झाला. शाळेत पोहोचायला उशीर झाल्याने बस, रिक्षांतील लहान शालेय विद्यार्थ्यांना रडू कोसळले.
पाऊस आणि रस्त्यांना अवघ्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने पडलेले मोठे खड्डे यांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.घोडबंदरच्या भाईंदरपाड्यापर्यंत ही रांग आली होती. तीन हात नाक्यावरही कोंडी झाली होती. जेमतेम २०० मीटरचे अंतर पार करण्याकरिता एक तास लागत होता.
नोकरदारांनी वाहिली लाखोलीशाळेत लेटमार्क लागेल या भीतीने काही लहान मुले शाळेच्या बस, रिक्षात रडू लागली. दुपारच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या मुलांनाही वाहतूक कोंडीने अक्षरश: रडवले. कामावर जाणाऱ्या हजारो ठाणेकर नोकरदारांनाही कोंडीने त्रस्त केले. ठाण्याहून नवी मुंबई, मुंबई व कल्याणच्या दिशेला नोकरीनिमित्त हजारो ठाणेकर जातात. काहींनी वाहतुकीचा रांग पाहून अर्ध्या रस्त्यातून घरी परतणे पसंत केले. रस्त्यावरील खड्ड्यांच्या नावाने ते लाखोली वाहत होते.
खड्डे बुजविण्याच्या कामांचा वाहतुकीला फटका वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता भिवंडी मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम गुरुवारी रात्रीपासून हाती घेतल्यामुळे ही कोंडी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच साकेतपुढील सिग्नल यंत्रणा वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बंद ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने होणारी वाहतूक साकेत पूल ते माजीवडा नाक्यापासून अगदी घोडबंदर कासारवडवली नागला बंदरपर्यंत ठप्प झाली होती. भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते भिवंडीतील रांजनोली नाका येथपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ ते २० मिनिटांचे अंतर पार करण्यास वाहनांना तब्बल दोन तास लागत होते. याचा सर्वाधिक फटका सकाळच्या वेळेस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला.
केवळ तीन दिवसांच्या पावसाने ठाण्यातील रस्त्यांची चाळण केली आहे. घोडबंदर मार्गांवरील बोरिवलीच्या मार्गिकेवर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातच सकाळी जोरदार पाऊस झाल्याने येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग कमालीचा मंदावला. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक सुरळीत असताना रस्त्यांवर उभे असलेले वाहतूक पोलीस शुक्रवारी कुठेच दिसले नाहीत. स्थानिक नागरिक आणि काही रिक्षाचालक यांनी रस्त्यावर उतरून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला.