भिवंडी : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होण्याच्या घटना आतापर्यंत ऐकिवात होत्या. मात्र भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून टोईंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसच वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत नागरिकांवर विनाकारण कारवाईचा बडगा उगारत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. वाहतुकीला कोणत्याही प्रकारची अडचण व अडथळा नसलेल्या दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलीस टोईंग व्हेनच्या माध्यमातून थेट उचलून नेत कारवाई करत आहेत. वाहतूक पोलिसांच्या या विनाकारण नाहक त्रासाने भिवंडीतील नागरिक हैराण झाले आहेत.
भिवंडी महानगरपालिकेच्या समोर असलेल्या जकात नाका परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सुटावी यासाठी वाहतूक व मनपा प्रशासनाच्या वतीने अशोक नगरच्या प्रवेशद्वारावर लोखंडी बेरिगेट्स लावण्यात आले आहेत. या बॅरिगेटमुळे अवजड व मोठ्या वाहनांना अशोक नगर रस्त्यावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यातच उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाचे काम सुरु असल्याने दुचाकी वाहन पार्किंगची मोठी अडचण शहरात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक आपल्या दुचाकी अशोकनगर येथे पार्क करून महापालिका,तहसीलदार व इतर शासकीय कार्यालयांमध्ये जात असतात.
वाहतूककोंडीला कोणताही अडथळा न करता दुचाकीस्वार आपली वाहने अशोक नगररस्त्यावर पार्क करून ठेवत असून वाहतूक पोलीस टोईंग व्हॅन घेऊन वाहतुकीस अडथळा नसलेल्या व रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी उचलून घेऊन जात आहेत. एखाद्या नागरिकाने गाडी उचलताना विनंती केली तरी वाहतूक पोलीस कोणतेही म्हणणे ऐकून न घेता थेट वाहने उचलून कल्याण नाका येथे घेऊन जातात.
अशोक नगर रस्त्यावर नो पार्किंगचे बोर्ड लावले असल्याने वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनच्या माध्यमातून ही कारवाई करत असल्याची कारणे टोईंग व्हॅनवाले नागरिकांना देत असतात. मात्र भिवंडीत तहसीलदार,पंचायत समिती,मनपा मुख्यालय,बँक,पोस्ट ऑफिस,तालुका पोलीस ठाणे,पोलीस उपायुक्त कार्यालय,रजिस्टर कार्यालय,आमदार ,खासदार यांची कार्यालये व न्यायालय हि सर्व शासकीय कार्यालये याच परिसरात असून या ठिकाणी कुठेही वाहन पार्किंग नसून उलट टोईंग व्हॅनवाले नागरिकांवर कारवाई करत असल्याने वाहन चालकांकडून मनपा व वाहतूक पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दुसरीकडे अशोक नगरच्या रस्त्यावर लोखंडी बॅरिगेट असतांना वाहतूक पोलीस आपली टोईंग व्हॅन थेट वाहतूक नियम मोडून बॅरिगेटच्या बाजूने नेत असतात,एकीकडे नागरिकांना एक नियम तर दुसरीकडे स्वतःच वाहतूक नियम मोडत असलेल्या टोईंग व्हॅनवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.