ठाणे : विधानसभा निवडणुकीत मतदानरूपी मिळालेल्या आशीर्वादानंतर मनसेने आता आगामी ठाणे महापालिका निवडणुकीची रणनीती तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, येत्या ९ नोव्हेंबर रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाण्यात दाखल होणार असून ते दिवसभर पदाधिकाऱ्यांशी विधानसभानिहाय बैठका घेऊन चर्चा करणार आहेत. शनिवारी सकाळी ते ठाण्यातील आपल्या मेहुणीच्या घरी दिवाळीनिमित्त आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.
ठाण्यातील पाचपाखाडी भागातील सेंटर पॉइंट येथे ते आले असता यावेळी त्यांनी ठाण्यातील पदाधिकाºयांशी बोलताना ही माहिती दिली आहे. ९ तारखेला होणाºया या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदारसंघांचा आढावादेखील ते घेणार आहेत. ठाण्यातील तीन आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांत मनसेने आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे राज्यातील मनसेचे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. तर, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा थोडक्यात पराभव झाला आहे. ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघांतील मनसेच्या उमेदवारांनादेखील या विधानसभेच्या निकालामध्ये चांगली मते पडली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही का होईना मनसेच्या मतांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असल्याने ठाकरे यांनी जिल्ह्यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात कोणत्या मतदारसंघात मनसेला किती मते मिळाली, मनसेची कोणत्या मतदारसंघात ताकद आहे, याचा आढावादेखील घेतला जाणार आहे.मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीशी युतीचे संकेतआगामी पालिकेच्या निवडणुकादेखील होणार असल्याने त्या दृष्टीने मनसेच्या पदाधिकाºयांना राज ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठाणे शहर मतदारसंघात आणि जिल्ह्यातील जिथेजिथे मनसेचे उमेदवार उभे केले होते, त्यात्या ठिकाणी राष्ट्रवादीने या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्येदेखील राष्ट्रवादीने मनसेशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बैठकीत या मुद्यावरदेखील चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.