ठाणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या शनिवारी, रविवारी म्हणजे ४ व ५ सप्टेंबर रोजी अनुक्रमे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० व संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा होणार आहे. यास अनुसरून ठाणे शहरामधील राज्य लोकसेवेच्या परीक्षेच्या १४ केंद्रे व संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी चार उपकेंद्रांवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने परीक्षेसाठी संबंधित कर्मचारी व उमेदवारांव्यतिरिक्त मनाई आदेश जारी केला आहे.
ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंह यांच्या आदेशाने जारी केलेल्या या आदेशानुसार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मनाई आदेश लागू आहेत. या काळात परीक्षा सुरू असताना पोलीस विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, परीक्षा केंद्रावरील संबंधित प्राधिकृत अधिकारी, कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्याखेरीज अन्य व्यक्तींना केंद्रावर, उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यात आला आहे. या परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बूथ ही दुकाने, सेवा बंद ठेवण्याचे मोबाईल फोन वापर करण्यास मनाई आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.