ठाणे: महाज्योती मार्फत यूपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यात १६ जुलैराेजी ठिकठिकाणी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यात काही ठिकाण परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची दखल घेऊन नियमानुसार चौकशी सुरू करण्यात येत आहे. या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला असून परीक्षे दरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महाज्योतीकडून स्पष्ठ करण्यात आले आहे.
यूपीएससी पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केलेली होती. या परीक्षेसाठी २० हजार २१८ उमेदवार पात्र होते. त्यातील १३ हजार १८४ उमेदवारांनी राज्यातील १०२ परीक्षा केंद्रांसह दिल्ली येथील दाेन केंद्रावर परीक्षा दिली आहे. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
या चौकशी अधिकार्यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला आहे. संबंधित विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई हाेईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महाज्योतीने केले आहे.