उल्हासनगर : कॅम्प नं-४, संभाजी चौकातील समाजमंदिरात महापालिकेने नागरी वर्धिनी केंद्र उभारले असून केंद्राचे उदघाटन आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले. आरोग्य केंद्र सुरू झाल्याने, परिसरातील शेकडो नागरिक या आरोग्य केंद्राचा लाभ घेता येणार आहे.
उल्हासनगर महापालिकेने रिजेन्सी अंटेलिया येथे उभारलेल्या २०० खाटाच्या रुग्णालयाचे खाजगीकरण केले. त्यानंतर महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आरोग्य केंद्र सुरू केले असून प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-५ व राज्य शासनाच्या १५ वा वित्त आयोग अंतर्गत आयुष्मान नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र कॅम्प नं-४ येथील संभाजी चौकात तसेच दुर्गापाडा येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-१० सोमवार पासून सुरू केले. सोमवारी दुपारी आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते केंद्राचे उदघाटन झाले. यावेळी उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैधकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विद्या चव्हाण, दिनेश सरोदे यांच्यासह सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका हद्दीत सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान आरोग्य मंदिर-नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र, तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-१० मार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांस मोफत आरोग्य सेवा पूर्रावण्यात येणार आहेत. या आरोग्य केंद्रामार्फत मोफत वैद्यकीय तपासणी, मोफत औषधोपचार उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार तज्ञ व संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. आयुक्त शेख यांनी शासनाच्या या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहनही केले.